Coronavirus Symptoms: त्वचेवर येणारे लाल चकत्ते देतात कोविड-19 संसर्गाचा संकेत; पहा, काय म्हणतात तज्ञ?
दिवसागणित कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड-19 वर ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने संसर्ग वाढत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर जगभरात संशोधनही सुरु आहे. यात कोरोना व्हायरस संसर्गाची वेगवेगळी लक्षणे समोर येत आहेत.
जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचे दाहक रुप अनुभवायला मिळत आहे. दिवसागणित कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड-19 (Covid-19) वर ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने संसर्ग वाढत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर जगभरात संशोधनही सुरु आहे. यात कोरोना व्हायरस संसर्गाची वेगवेगळी लक्षणे समोर येत आहेत. साधारणपणे ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, चव, वास न येणे, अंगदुखी ही कोरोना संसर्गाची लक्षणे आहेत. परंतु, त्वचेवर लाल चकत्ते उठणे हे देखील कोविड-19 संसर्गाचा संकेत देतं, अशी माहिती समोर येत आहे.
कोरोना व्हायरस संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात ताप, सर्दी, सुका खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, ही प्राथमिक लक्षणे असल्याचे आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात आले होते. परंतु, यावर जसजसे संशोधन होऊ लागले तशी याची नवनवी लक्षणे समोर येऊ लागली. त्यानंतर चव-वास न येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा या नव्या लक्षणांची भर पडली. आता मात्र अजून एक नवे लक्षणे समोर आले आहे. ते म्हणजे त्वचेवर लाल चकत्ते उठणे. कोविड-19 संसर्गाचे हे सुरुवातीचे लक्षण असू शकते. (Coronavirus Symptoms: ताप-खोकला होण्यापूर्वी कोविड-19 संसर्गाची दिसू शकतात ही 4 लक्षणे)
किंग्स कॉलेज लंडन (King’s College London) च्या संशोधकांनी 336,000 ब्रिटिश नागरिकांच्या डेटाचा अभ्यास केला. त्यातून असे दिसून आले की, 336,000 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 9% रुग्णांच्या अंगावर लाल रंगाचे चकत्ते उठले होते. तज्ञांनुसार, कोविड-19 ची लागण झाल्यास सुरुवातीच्या काळात त्वचेवर लाल चकत्ते दिसू शकतात. विशेष म्हणजे कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आणि लक्षणे दिसू लागल्यानंतर काही आठवड्यांनी देखील हे लाल चकत्ते अंगावर येऊ शकतात.
या अभ्यासासाठी ब्रिटनमधील तब्बल 336,000 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. कोविड अॅपच्या साहाय्याने डेटा गोळा करण्यात आला. यात युजर्सने आपल्या लक्षणांची माहिती दिली होती. दरम्यान, कोविड-19 लक्षणांमध्ये त्वचेवरील लाल चकत्ते हे लक्षणं जोडावे. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग वेळीच ओळखणे शक्य होईल, अशी मागणी किंग्स कॉलेज लंडनचे जेनेटिक महामारी विज्ञानाचे प्रोफेसर टिम स्पेक्टर (Tim Spector) यांनी केली आहे.