Coronavirus: केरळमधील कोरोना व्हायरस रुग्णांवर सुरु होणार Zingivir-H या आयुर्वेदिक औषधाची क्लिनिकल चाचणी; CTRI ने दिली मान्यता

केरळ (Kerala) मधील पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाउंडेशनने (Pankajakasthuri Herbal Research Foundation) विकसित केलेल्या आयुर्वेदिक औषधास, क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री ऑफ इंडिया (CTRI) ने

File Image Ayurvedic Herbs (Photo credits: Pexels)

केरळ (Kerala) मधील पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाउंडेशनने (Pankajakasthuri Herbal Research Foundation) विकसित केलेल्या आयुर्वेदिक औषधास, क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री ऑफ इंडिया (CTRI) ने कोरोना व्हायरस (Coronavirus) रूग्णांवर क्लिनिकल चाचणीसाठी मान्यता दिली आहे. झिंगिव्हिअर-एच (Zingivir-H) टॅबलेट हे श्वसन संक्रमण, विषाणूजन्य ताप, तीव्र विषाणूजन्य ब्राँकायटिस विरूद्ध प्रभावी आहे. वैज्ञानिक प्रमाणीकरणादरम्यान हे औषध इन्फ्लुएंझा विषाणूविरूद्धही प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी येथे झालेल्या विट्रो प्रयोगांमध्ये हे सिद्ध केले आहे की मानवी पेशीमध्ये या औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. जे. हरेंद्रन नायर (Dr J Hareendran Nair) यांनी याबाबत माहिती दिली.

नायर म्हणाले, 'औषधाच्या चाचणीबाबत मी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि दिल्लीतील वैद्यकीय महाविद्यालयांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी माझी विनंती मान्य केल्याने संस्थात्मक वैद्यकीय समितीची मान्यता मिळाली. त्यानंतर मी मंजुरीसाठी सीटीआरआयकडे संपर्क साधला आणि त्यानंतर क्लिनिकल चाचणी सुरू झाली.'

ते पुढे म्हणाले, ‘झिंगीविर-एचमध्ये औषधी वनस्पतीसहित सात घटक आहेत आणि हे आपल्या वैज्ञानिक हस्तलिखितमध्ये लिहिलेले आहेत. हा बर्‍याच वर्षांपासून आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसचा एक भाग आहे. व्हायरल ताप, तीव्र विषाणूजन्य ब्राँकायटिस आणि संसर्गजन्य ताप यासाठी मी जवळपास 15 वर्षांपासून हाच फॉर्म्युला वापरत आहे आणि त्याचे चांगले परिणाम मला दिसून आले आहेत.’ (हेही वाचा: Coronavirus Symptoms: खोकला, ताप यांसह समोर आली कोरोना विषाणूची नवीन सहा लक्षणे, घ्या जाणून)

‘आम्ही मेच्या अखेरीसपर्यंत निकाल येण्याची अपेक्षा करीत आहोत. मला निकालाबद्दल अजूनतरी खात्री नाही, मात्र जर निकाल सकारात्मक आला तर ते आयुर्वेदचे यश असेल आणि तसे झाले नाही तर ते माझे अपयश ठरेल,’ असे नायर म्हणाले. सध्या ही क्लिनिकल चाचणी 120 रूग्णांवर घेतली जाणार आहे. या चाचणीचा भाग म्हणून 15 रुग्णांवर यापूर्वीच उपचार करण्यात आले आहेत.