Monkeypox Infection: ताप, अंगदुखी, सूज आदी लक्षणं असल्यास सतर्क राहा; ICMR ने मंकीपॉक्सबाबत दिला 'हा' सल्ला

मंकीपॉक्स हा सामान्यतः आफ्रिकन देशांमध्ये आढळणारा एक सौम्य विषाणूजन्य संसर्ग आहे.

Monkeypox | Representative Image( Pic Credit-ANI)

Monkeypox Infection: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) म्हटले आहे की, भारत मंकीपॉक्स (Monkeypox) चा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, देशात अद्याप एकही केस सापडलेली नाही. कोरोना महामारीशी झुंज देत असलेल्या अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. ICMR शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा मुखर्जी यांनी सांगितले की, भारत मंकीपॉक्स संसर्गासाठी तयार आहे. कारण, तो युरोप आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे.

भारतात अद्याप एकही केस आढळलेली नाही. आरोग्य तज्ञांनी कोणत्याही असामान्य लक्षणांवर लक्ष ठेवण्याच्या गरजेवर भर दिला आहे. विशेषत: मंकीपॉक्स-ग्रस्त देशांमध्ये प्रवास केलेल्या लोकांमध्ये लक्षणं आढळण्याची शक्यता दाट असते. या लक्षणांमध्ये जास्त ताप येणे, ग्रंथी सुजणे, अंगदुखी, अंगावर लाल पट्टे येणे इत्यादी लक्षणं आढळतात. (हेही वाचा -Monkeypox Virus: लक्षणे दिसल्यास ताबडतोब चाचणी करून घेण्याचे मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन)

'हे' लक्षणं दिसल्यास सावध रहा -

अशी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींनीही तत्काळ तपासणी करून घ्यावी, असे डॉ.मुखर्जी यांनी सांगितले. पुण्यातील एनआयव्हीसह अनेक ठिकाणी त्याच्या तपासाची सोय आहे. या संसर्गामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. एखाद्यामध्ये लक्षणे दिसू लागल्यास त्याच्या जवळ जाणे टाळावे.

आरोग्य मंत्रालय लवकरचं जारी करणार मार्गदर्शक तत्त्वे -

त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरचं मंकीपॉक्सवर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये संक्रमित आढळलेल्या व्यक्तीला अलगावमध्ये ठेवणे, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवणे, त्यांचे निरीक्षण करणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि जोखीम मूल्यांकन यासारख्या गोष्टींचा समावेश असेल.

WHO ने दिला हा सल्ला -

दरम्यान डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जर आपण त्वरित काळजी घेतली तर मंकीपॉक्स संसर्गाचा प्रसार नियंत्रित केला जाऊ शकतो. मंकीपॉक्स हा सामान्यतः आफ्रिकन देशांमध्ये आढळणारा एक सौम्य विषाणूजन्य संसर्ग आहे. परंतु, आता अमेरिका, युरोपसह सुमारे 200 देशांमध्ये त्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यामुळे WHO ची चिंता वाढली आहे.