कोविड-19 साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशभरात उद्रेक झाला असतानाच, आयुष-64 (AYUSH 64) हे सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रूग्णांसाठी आशेचा किरण घेऊन आले आहे. आयुष मंत्रालया अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस), विकसित केलेले आयुष-64 पॉलीहर्बल फॉर्म्युलेशन (एकापेक्षा अधिक वनौषधींचा वापर करून तयार केलेले औषध) हे लक्षणे नसलेल्या, सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रुग्णांची प्राथमिक काळजी घेण्यात साहाय्यक असल्याचे देशातील नामांकित संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. सुरुवातीला हे औषध मलेरियासाठी 1980 साली विकसित केले होते आणि आता पुन्हा कोविड-19 साठी याचा वापर करण्यात आला आहे.
आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) च्या सहकार्याने सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रुग्णांच्या व्यवस्थापनात आयुष 64 च्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी एक मल्टी सेंटर क्लिनिकल चाचणी नुकतीच करण्यात आली. (नक्की वाचा: Covid 19 In India: आयुष मंत्रालयाकडून कोविड-19 विषयक आयुर्वेद, युनानी उपचारपद्धतीबाबतची नवी नियमावली जारी ).
आयुर्वेद आणि योग आधारित राष्ट्रीय क्लिनिकल व्यवस्थापन प्रोटोकॉलमध्ये देखील या औषधाची शिफारस केली जाते, आयसीएमआरच्या कोविड-19 व्यवस्थापनावरील कृती दलाने देखील याची तपासणी केली आहे. (नक्की वाचा: COVID 19 Treatment: DGCI कडून Zydus Cadila च्या Pegylated Interferon alpha-2b, ‘Virafin’ ला कोविड 19 इंफेक्शन वर वापरण्यावर परवानगी)
पुणे येथील संधिवात रोग केंद्राचे संचालक आणि आयुष मंत्रालय-सीएसआयआरचे मानद मुख्य क्लिनिकल समन्वयक डॉ. अरविंद चोपडा यांनी तीन केंद्रांवर ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती दिली. केजीएमयू, लखनऊ; डीएमआयएमएस, वर्धा आणि बीएमसी कोविड केंद्र, मुंबई मध्ये प्रत्येकी 70 सहभागींचा समावेश होता.
आयुष-64 चे परिणाम अत्यंत चांगले असून सद्यस्थितीत गरजू रूग्णांना आयुष 64 चा लाभ मिळाला पाहिजे असे आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक आणि आंतर-शिस्त आयुष संशोधन व विकास कृती दलाचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले.
समितीने आयुष 64 च्या निकालाचा काळजीपूर्वक आढावा घेतला असून आणि लक्षणे नसलेल्या, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रुग्णाच्या व्यवस्थापनात आयुष 64 चा उपयोग करण्याची शिफारस केली आहे अशी माहिती एमसीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. कटोच यांनी दिली. सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 व्यवस्थापनात आयुष 64 संदर्भात राज्य परवाना अधिकारी/नियामक यांच्याशी मंत्रालयाने संपर्क साधावा अशी शिफारस या समितीने केली आहे.