Another COVID-19 Wave To Hit US? अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ; नव्या लाटेची शक्यता, CDC ने दिला इशारा
आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सीडीसीचे कोरोना अधिकारी डॉ. ब्रेंडन जॅक्सन म्हणतात की, सहा-सात महिन्यांच्या घसरणीनंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
सध्या जवळजवळ सर्वत्र कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र या विषाणूने आता अमेरिकेमध्ये (US) चिंता वाढवल्या आहेत. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) चेतावणी दिली आहे की, देशात कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 च्या तुलनेत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याधीच्या 15 जुलैच्या आठवड्यात अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे 7100 रुग्ण दाखल झाले. तर मागील आठवड्यात हा आकडा 6444 होता. यासह मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात रुग्णांमध्ये आणखी वाढ झाली आहे.
अशा परिस्थितीत अमेरिकेत कोरोनाची नवी लाट येण्याची भीती आहे. आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सीडीसीचे कोरोना अधिकारी डॉ. ब्रेंडन जॅक्सन म्हणतात की, सहा-सात महिन्यांच्या घसरणीनंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ही उन्हाळ्याच्या लाटेची सुरुवात असू शकते, असे डॉ.जॅक्सन यांनी सांगितले. सीडीसीच्या प्रवक्त्या कॅथलीन कॉनली यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात कोरोना विषाणू रुग्ण वाढले आहेत. मात्र तुलनेने संसर्गाची प्रकरणे अजून तरी कमी आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या संख्येतही घट झाली आहे. (हेही वाचा: Lok Sabha Cancer Data: धक्कादायक! 2020 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण; सरकारने लोकसभेत दिली देशातील रुग्णांची माहिती)
21 जुलैपर्यंत सुमारे 0.73% लोक कोरोनामुळे रुग्णालयात आले होते. एक महिन्यापूर्वी हा आकडा 0.49% होता. डॉक्टरांच्यामते कोरोना रुग्णांमध्ये झालेली वाढ ही उन्हाळ्यातील नवीन लाटेची सुरुवात असू शकते. म्हणूनच त्यांनी XBB सबव्हेरिएंटच्या बूस्टर डोसची शिफारस केली आहे. विशेषत: ज्यांना विषाणूचा जास्त धोका आहे, त्यांना बूस्टर डोस घेण्याचा विशेष सल्ला देण्यात आला आहे.