Vasu Baras 2023 Muhurat: वसूबारस यंदा 9 नोव्हेंबरला; जाणून घ्या गोवत्स द्वादशीला पूजन कसं कराल?

तिन्ही सांजेला गाय-वासरांना ओवाळलं जातं. दारासमोर रांगोळी काढून दिवा लावला जातो.

Vasubaras | File Image

महाराष्ट्रामध्ये वसूबारस (Vasubaras) सणाने दिवाळी सणाची सुरूवात होते. वसूबारस दिवशी घरातील पशूधनाची पूजा केली जाते. गोवत्स द्वादशी असाही वसूबारस हा सण ओळखला जातो. यंदा वसूबारस हा सण 9 नोव्हेंबर दिवशी आहे. अश्विन कृष्ण द्वादशीच्या सायंकाळी गोपूजा करून दिवाळसणाला सुरूवात होते. हिंदुधर्मीयांमध्ये गाय-वासरूंची पूजा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात हा सण वसूबारस म्हणून तर गुजरातमध्ये वाघ बारस किंवा बच बारस, आंध्र प्रदेशमध्ये श्रीपाद श्री वल्लभ यांचा श्रीपाद वल्लभ आराधना उत्सव म्हणून साजरा केला जातो.

वसूबारसच्या निमित्ताने घरातील पशूधनाप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. वसुबारस ला नंदिनी व्रत असेही म्हणतात, कारण पवित्र मानल्या जाणाऱ्या नंदिनी आणि नंदीची पूजा केली जाते. वसुबारसला उपवास ठेवला जातो. वसुबारसला गहू आणि दुधाचे पदार्थ खाणे टाळतात. कुटुंबातील महिला मुलांच्या कल्याणासाठी उपवास ठेवतात. नंदिनी व्रत दरम्यान, लोक गायींना दागिन्यांनी सजवतात आणि त्यांच्या कपाळावर सिंदूर लावतात. सत्त्वप्रधान असलेली गाय तिच्या दुधाने समाजाचे पालनपोषण करते आणि शेणाच्या खताने मातीची सुपीकता वाढवते. त्यामुळे वसुबारसनिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते. अंकुरित मूग यांसारखे नैवेद्य भोग म्हणून अर्पण केले जातात. Diwali 2023 Invitation Cards in Marathi: दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळींना WhatsApp Messages, SMS द्वारा फराळाचं आमंत्रण देण्यासाठी खास मराठमोळे नमुने .

वसूबारस कधी जाणून घ्या तिथी मुहूर्त

वसूबारस हा सण 9 नोव्हेंबर दिवशी आहे. यंदा रमा एकादशी आणि वसूबारस एकाच दिवशी साजरं केलं जाणार आहे. द्वादशीची सुरूवार 9 नोव्हेंबरला 10.43 पासून सुरू होणार असून त्याची समाप्ती 10 नोव्हेंबरला 12 वाजून 36 मिनिटाने होणार आहे.

ग्रामीण भागात बैलपोळ्याप्रमाणे वसूबारस दिवशी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो. तिन्ही सांजेला गाय-वासरांना ओवाळलं जातं. दारासमोर रांगोळी काढून दिवा लावला जातो.