Diwali 2019: आदिवासी बांधव ‘अशी’ करतात दिवाळी साजरी
दिवाळीत आदिवासीबांधव हिरवा, हिनाय, वाघया, नाराणा देवी आणि गावदेवी या कुलदेवतांची पूजा करतात. वाघासारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून आदिवासी ग्रामीण भागात ‘वाघबारस’ साजरी करण्याची प्रथा आहे.
दिवाळी (Diwali) म्हटलं की फटाक्यांची आतीषबाजी, घरासमोर लावलेले आकाश कंदील, नवीन कपडे, फराळ आणि दिवाळी पहाटचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम. मात्र, हा पारंपारिक सण साजरा करताना निसर्गाला हानी न पोहोचवता आदिवासी बांधव दिवाळीचा सण साजरा करतात.(Tribal people Celebrate Diwali Festival) आदिवासी समाजामध्ये होळी, दसरा आणि दिवाळी हे मुख्य उत्सव साजरे केले जातात. दिवाळीत आदिवासीबांधव हिरवा, हिनाय, वाघया, नाराणा देवी आणि गावदेवी या कुलदेवतांची पूजा करतात. वाघासारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून आदिवासी ग्रामीण भागात ‘वाघबारस’ साजरी करण्याची प्रथा आहे.
दिवाळीच्या दिवशी ‘वाघबारस’ साजरी करण्याची प्रथा -
आदिवासी बांधव गुरे चारण्यासाठी जंगलात जात असतात. सर्व आदिवासींनी वाघाला देव मानले आहे. त्यामुळे आदिवासी भागांमध्ये वाघोबाची मंदिरे पाहायला मिळतात. वाघ देवतेचे मंदिर हे गावाच्या वेशीवर असते. मंदीरात दगडी चिऱ्यावर काही ठिकाणी लाकडावर वाघ देवता, नागदेवता, मोर, सुर्य, चंद्र यांची चित्रे कोरलेली असतात. दिवाळीच्या दिवशी आदिवासी बांधव ‘वाघबारस’ ही प्रथा साजरी करतात. यादिवशी गावातील आदिवासी बांधव निसर्गाची पूजा करतात. पुजेवेळी देवताच्या मुर्तीला शेंदुर लावून दुध व पाण्याने आंघोळ घातली जाते. हा सर्व पुजाविधी झाल्यानंतर ग्रामस्थ देवाला नारळ, गोड पदार्थाचा नैवद्य दाखवितात. दिंडोरी, कळवण, सुरगाणा, सटाणा, इगतपूरी तालुक्यातील बहुतेक भागात वाघदेवतेला गोड नैवद्यासह बोकडाचा नैवद्यदेखील दाखवला जातो. दिवाळीच्या दिवशी आदिवासी गुरांना रंगवतात आणि त्यांची पुजा करतात. मात्र, इतरांप्रमाणे आदिवासींमध्ये फराळ केला जात नाही.
डहाणू तासुक्यामध्ये वाघबारस, तेरस, चावदस आणि पूनम अशी चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी आदिवासी आपले घर शेणा-मातीने सारवून काढतात. तसेच दाराजवळ आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. काही आदिवासी भागांमध्ये दिवाळीच्या दिवशी चवळीच्या शेंगा, कंद शिजवले जातात तर रात्री तारपानृत्य करून आनंदोत्सव साजरा केला जातो.