Shravan Masarambh 2026: यंदा श्रावण महिन्याची सुरूवात कधी? जाणून घ्या श्रावणी सोमवार, मंगळागौर सह महत्त्वाच्या सणाच्या तारखा

यंदा महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याची सुरूवात 13 ऑगस्ट 2026 दिवशी होणार आहे. तर सांगता 11 सप्टेंबर दिवशी होणार आहे.

Shravan Masarambh 2026: यंदा श्रावण महिन्याची सुरूवात कधी? जाणून घ्या श्रावणी सोमवार, मंगळागौर सह महत्त्वाच्या सणाच्या तारखा
Shravan Masaranbh

Shravan Masarambh 2026: मराठी दिनदर्शिकेमधील पाचवा महिना म्हणजे श्रावण (Shravan). व्रतवैकल्यांचा, सणांचा राजा म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. हिंदू धर्मियांसाठी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना असल्याने त्याचे विशेष महत्त्व असते. यंदा महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याची सुरूवात 13 ऑगस्ट 2026 दिवशी होणार आहे. तर सांगता 11 सप्टेंबर दिवशी होणार आहे. श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यासारख्या अनेक सणांची आणि त्याच्या जोडीने व्रतांची रेलचेल असल्याने वातावरण चैतन्यमय असते.मग पहा यंदा श्रावण महिन्याची सुरूवात कधी? महत्त्वाचे सण आणि व्रत वैकल्याची महत्त्वपूर्ण माहिती. नक्की वाचा: मंगळागौरीचा उत्सव घरच्या घरी छान साग्रसंगीत करण्यासाठी हातावर काढण्यासाठी मेहंदीच्या अगदी सोप्या आणि सुरेख डिझाईन्स.

यंदा श्रावण महिन्याची सुरूवात कधी?

महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरूवात 13 ऑगस्ट दिवशी होणार आहे. 12 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 06 मिनिटांनी अमावस्या समाप्ती आहे. त्यानंतर श्रावण महिन्याची सुरूवात होईल. हा श्रावण महिना 11 सप्टेंबर पर्यंत आहे. 11 सप्टेंबर दिवशी सकाळी 8 वाजून 56 मिनिटांनी अमावस्या समाप्ती आहे.

उत्तर भारत आणि महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरूवात वेगवेगळी का ?

उत्तर भारत आणि महाराष्ट्रात श्रावण महिना वेगवेगळ्या तारखांना सुरू होण्याचे मुख्य कारण म्हणजे या दोन भागांत हिंदू पंचांगाच्या दोन वेगळ्या पद्धती वापरल्या जातात. महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण भारतामध्ये महिना अमावास्येला संपतो आणि दुसऱ्या दिवसापासून (शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून) नवीन महिना सुरू होतो. म्हणजेच महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षाने होते आणि शेवट कृष्ण पक्षाने अमावास्येला होतो. तर उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान मध्ये महिना पौर्णिमेला संपतो. म्हणजे महिन्याची सुरुवात कृष्ण पक्षाने होते आणि शेवट शुक्ल पक्षाने पौर्णिमेला होतो.यामुळे पौर्णिमान्त पद्धतीतील महिना अमान्त पद्धतीतील त्याच नावाच्या महिन्यापेक्षा साधारण 15 दिवस आधी सुरू होतो. म्हणजेच उत्तर भारतातील 'सावन' महिना महाराष्ट्रातील श्रावणापेक्षा सुमारे पंधरवडाभर आधी सुरू होतो आणि आधी संपतो.

महाराष्ट्रातील श्रावण महिन्यात येणारे महत्त्वाचे सण आणि व्रत

  • श्रावण मासारंभ - 13 ऑगस्ट 2026
  • जरा जिवंतिका पूजन- 14, 21, 28 ऑगस्ट आणि 4, 11 सप्टेंबर
  • नागपंचमी - 17 ऑगस्ट
  • श्रावणी सोमवार - 17, 24, 31 ऑगस्ट, 7 सप्टेंबर
  • नारळी पौर्णिमा - 27 ऑगस्ट
  • रक्षाबंधन - 28 ऑगस्ट
  • श्री कृष्ण जयंती उपवास- 4 सप्टेंबर
  • गोपाळकाला - 5 सप्टेंबर
  • पोळा - 10 सप्टेंबर
  • मंगळागौर पूजन - 18, 25 ऑगस्ट, 1, 8 सप्टेंबर

श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना असल्याने या काळात अनेक घरांमध्ये मांसाहार व्यर्ज्य असतो. व्रत वैकल्यांची रेलचेल असल्याने अनेक उपवास असतात. या काळात विशिष्ट प्रकारच्या आहार-पद्धती आणि उपवासाच्या परंपरा पाळल्या जातात, ज्या केवळ धार्मिक श्रद्धेपुरत्या मर्यादित नसून आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाच्या मानल्या जातात.श्रावण महिन्यातील उपवास आणि पथ्ये ही केवळ धार्मिक कर्मकांड नसून, ऋतुबदलाशी जुळवून घेण्यासाठी शरीराला मदत करणारी एक पारंपरिक आरोग्यदायी पद्धत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2026 01:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).