Pitru Paksha 2026: 27 सप्टेंबरपासून पितृपक्ष होतोय सुरु; जाणून घ्या श्राद्ध विधीमागील शास्त्रीय कारण, प्रचलित गैरसमज
यंदा भाद्रपद कृष्ण पक्ष अर्थात 'पितृपक्ष' रविवार, २७ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होत असून शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सर्वपित्री अमावस्येला समाप्त होणार आहे.
हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाला 'पितृपक्ष' (Pitru Paksha) असे संबोधले जाते. यंदा, पितृपक्षाला रविवार, 27 सप्टेंबर रोजी सुरुवात होत असून, शनिवार, 10ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येला त्याची सांगता होणार आहे. या पंधरा दिवसांच्या कालावधीत आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्राद्धविधी केले जातात. मात्र या परंपरेभोवती समाजात अनेक समज-गैरसमज असल्याचे दिसून येतात. अनेकजण हा काळ अशुभ मानतात. त्यामुळेच जाणून घ्या पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्याकडून यामागील शास्त्रीय कारण!
पितृपक्षामागील संकल्पना
भारतीय तत्त्वज्ञानात 'आत्मा' ही संकल्पना अत्यंत मध्यवर्ती मानली जाते. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवाचा अंत हा अटळ आहे, हे निसर्गनियम मानले जाते. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर नष्ट होते, मात्र आत्मा अविनाशी, निर्गुण व निराकार असतो, अशी श्रद्धा आहे. मृत आप्तेष्टांचे आत्मे भाद्रपद कृष्ण पक्षात आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्यास येतात, अशी पारंपरिक समजूत असून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या काळात 'महालय श्राद्ध' करण्याचे शास्त्रात सांगितले आहे.
ज्या तिथीला वडिलांचा मृत्यू झाला असेल, त्या तिथीला सर्व पितरांच्या नावे श्राद्ध करण्याची पद्धत आहे. यामध्ये पिता, पितामह (आजोबा), प्रपितामह (पणजोबा) तसेच माता, पितामही (आजी) आणि प्रपितामही (पणजी) यांचा उल्लेख केला जातो. योग्य तिथीला हे शक्य न झाल्यास, सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेपर्यंत कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येते, असेही सांगितले जाते.
भाद्रपद कृष्णपक्षातच श्राद्ध का?
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने, भाद्रपद महिन्यात शेतातील पीक तयार होण्याच्या काळात निसर्ग आणि पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा रुजली, असे मानले जाते. ज्यांनी जन्म दिला, शिक्षण दिले आणि संपत्ती दिली अशा पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी हा पंधरवडा राखीव ठेवण्यात आला. यानंतर येणाऱ्या आश्विन महिन्यात धान्य घरात येते, त्यामुळे आदिशक्तीच्या कृतज्ञतेप्रीत्यर्थ नवरात्रोत्सव साजरा केला जातो, आणि त्यानंतर दसरा-दिवाळीसारखे आनंदाचे सण येतात.
खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, सप्टेंबर अखेरीस सूर्य उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो, याला 'विषुवदिन' म्हणतात. आकाशातील उत्तर गोलार्ध देवतांचा तर दक्षिण गोलार्ध पितरांचा मानला जातो. हा कालखंड साधारणपणे भाद्रपद कृष्णपक्षातच येत असल्याने, याच काळात श्राद्धकर्म करण्याची प्रथा रूढ झाल्याचे सांगितले जाते. नक्की वाचा: Shradh Start and End Date 2026: पूर्वजांचे स्मरण आणि आशीर्वादाचा 16 दिवसांचा पवित्र काळ; जाणून घ्या श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचे संपूर्ण वेळापत्रक!
श्राद्धाचे स्वरूप आणि विधी
'श्रद्धा' या शब्दापासूनच 'श्राद्ध' हा शब्द तयार झाला असून, ही प्रथा भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पितरांच्या ठायी पुढील पिढीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य असते, या श्रद्धेतूनच श्राद्ध कल्पनेचा उगम झाला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. श्राद्धकर्मासाठी दिवसाच्या पाच भागांपैकी 'अपराण्हकाळाला' विशेष महत्त्व दिले जाते, आणि याच वेळेत संबंधित तिथीचे श्राद्ध करावे, असे सांगितले जाते.
श्राद्ध हे तीर्थक्षेत्री जाऊन विधीवत करता येते, किंवा पशु-पक्ष्यांना अन्न देऊनही ही परंपरा पाळली जाते. कावळ्याला मृतात्म्याची अनुभूती होते, अशी लोकश्रद्धा असल्याने कावळ्याला अन्न देण्याची पद्धतही रूढ आहे.
दानाचे महत्त्व
भारतीय संस्कृतीत दानाला विशेष स्थान आहे. डोनेशनप्रमाणे दान जाहीरपणे न देता, ते गुप्तपणे देण्याची परंपरा आहे. श्राद्धाच्या निमित्ताने पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजू लोकांना दान देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. सध्याच्या काळात अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, श्रमदान, ज्ञानदान अशा विविध स्वरूपांत ही परंपरा पाळली जात असल्याचे दिसून येते.
पितृपक्षाबद्दलचे प्रचलित गैरसमज
समाजात पितृपक्षाबाबत अनेक गैरसमज रूढ आहेत. पितृपक्ष अशुभ असतो, या काळात विवाहासारखी शुभकार्ये ठरवू नयेत, मौल्यवान वस्तूंची खरेदी किंवा आर्थिक व्यवहार करू नयेत, अशा समजुती प्रचलित आहेत. मात्र या समजुतींना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे सांगितले जाते. आपल्या पूर्वजांचे आत्मे याच काळात आपल्या घरी वास्तव्यास येत असतील, तर हा कालखंड अशुभ कसा असू शकेल, असा प्रश्न उपस्थित केला जातो. उलट, कुटुंबाची प्रगती पाहून पूर्वजांना आनंदच होत असल्याचे मानले जाते.
आधुनिक, स्पर्धात्मक आणि वैज्ञानिक युगात श्रद्धा असणे गैर नाही, मात्र त्या अंधश्रद्धेत रूपांतरित होऊ नयेत, असा सूर मांडला जातो. पितृपक्षातील पंधरा दिवस आर्थिक व्यवहार पूर्णतः थांबवण्याऐवजी, हा काळ पूर्वजांचे स्मरण करत, गरजूंना मदत करत आणि प्रामाणिकपणे व्यवहार करत साजरा करावा, असा संदेश या परंपरेतून दिला जातो.
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2026 06:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

