Navratari 2023: घटस्थापनेपासून आज नवरात्रीला सुरूवात; जाणून घ्या ललित पंचमी, कन्यापूजन, विजयादशमी कधी?

देवीच्या नऊ रूपांसह या नवरात्रीमध्ये ललिता पंचमी, अष्टमी च्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

Ghatasthapana Wishes (PC - File Image)

शारदीय नवरात्रीची (Shardiya Navratari) सुरूवात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होते. आज घटस्थापना (Ghatasthapana) करून यंदाच्या नवरात्र उत्सवाला (Navratari Utsav) सुरूवात झाली आहे. नवरात्री मध्ये नऊ दिवस देवीचा जागर करण्याची पद्धत आहे. यामध्ये आदिशक्तीचं पूजन केले जातं. घटाची अथवा देवीची स्थापना केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची विविधं रूपं पुजली जातात. तसेच या नऊ दिवसांच्या नवरात्रीमध्ये विशिष्ट दिवशी विषिष्ट पूजा करण्याची पद्धत आहे. देवीच्या नऊ रूपांसह यामध्ये ललिता पंचमी,  अष्टमी च्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. नवरात्री मध्ये कुमारिका पूजन देखील केले जाते. महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्रात भोंडला खेळण्याची पद्धत आहे. मग आजपासून सुरू झालेल्या या नवरात्री मध्ये हे सारे महत्त्वाचे दिवस कधी आहेत? हे जाणून घेत साजरा करा यंदाचा नवरात्र उत्सव! नक्की वाचा: Ghatasthapana 2023 Puja Vidhi: घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि संपूर्ण पूजा विधी .

ललिता पंचमी

नवरात्री मध्ये पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते. अश्विन शुद्ध पंचमीचा हा दिवस यंदा गुरूवार 19 ऑक्टोबर दिवशी आहे. महिलांसाठी या दिवसाचं विशेष महत्त्व असते. नवरात्री मध्ये ललिता पंचमी पासून खरी रंगत सुरू होते.

अष्टमी

देवीच्या या उत्सवामध्ये अष्टमीचा दिवस हा सर्वात मोठा सेलिब्रेशनचा दिवस असतो. या निमित्ताने अनेक ठिकाणी होम हवनाचं आयोजन केले जाते. लहान मुली, कुमारिका यांचं देखील पूजन अष्टमी दिवशी करण्याची रीत आहे. कन्यापूजन करून त्यांना भेटवस्तू, हलवा पुरीचा प्रसाद देण्याची रीत आहे. यंंदा अष्टमीला कन्यापूजन म्हणजे 22 ऑक्टोबर रविवारी ते केले जाऊ शकते.

विजया दशमी

नऊ रात्री देवीचा जागर करून दसरा अर्थात दहाव्या दिवशी विजया दशमीला मोठा सण साजरा केला जातो. विजया दशमीचा सण म्हणजेच दसरा यंदा 24 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे. दसरा हा हिंदू धर्मियांसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने या दिवशी सोनं लुटण्याची रीत आहे. अनेक शुभकामांना या दिवशी सुरूवात केली जाते. मोठे आर्थिक व्यवहार केले जातात.

भारतामध्ये प्रांतानुसारही वेगवेगळ्या भागात नवरात्र वेगवेगळ्या रीतींनुसार साजरी केली जाते. यामध्ये गुजरातच्या दांडिया, गरबाचं आकर्षण असतं.  पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापूजा केली जाते. षष्ठी पासून दशमी पर्यंत त्यांचे सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीने केले जाते.