Maharana Pratap Jayanti Tithi Date 2022: यंदा तिथी नुसार, महाराणा प्रताप जयंती 2 जून दिवशी होणार साजरी!

महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू राजपूत होते.

Veer Shiromani Maharana Pratap (Photo Credits: Wikimedia Commons)

16व्या शतकातील मेवाडचे राजे महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांचा जन्मदिवस देशभरात 9 मे दिवशी साजरा केला असला तरीही शासकीय पातळीवर महाराणा प्रताप जयंती (Maharana Pratap Jayanti) यंदा 2 जून दिवशी साजरी केली जाणार आहे. ग्रेग्रेरियन कॅलेंडर नुसार महाराणा प्रताप जयंती 9 मे दिवशी साजरी केली जाते. पण हिंदू संस्कृती आणि कॅलेंडर नुसार सण-समारंभ, महान लोकांच्या जयंत्या या हिंदू कॅलेंडर नुसार येणार्‍या तिथीला करण्याची प्रथा असल्याने यंदा 2 जून दिवशी ज्येष्ठ शुक्ल तृतीयेचं औचित्य साधत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने त्यांचं जन्मस्थान असलेल्या राजस्थान राज्यामध्ये 2 जूनला बॅंक हॉलिडे देखील घोषित करण्यात आला आहे.

महाराणाचे वंशज, उदयपूरचे माजी राजघराण्याचे सदस्य, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना करून आणि शस्त्रागारासह त्यांच्या वस्तू आणि मेवाडमध्ये असलेल्या त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा दिवस खास करतात. हे देखील नक्की वाचा: Happy Maharana Pratap Jayanti 2022 Wishes: महाराणा प्रताप जयंती निमित्त शानदार WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा! 

महाराणा प्रताप हे आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी मुघल सम्राट अकबर विरुद्ध हळदीघाटीच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहेत. जोवर चित्तोड परत मिळवत नाही तोवर जमिनीवर झोपेन आणि पालापाचोळा खाऊन दिवस काढेन अशी त्यांची शपथ होती. ही शपथ पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे या शपथेचा मान राखत आजही अनेक राजपूत आपल्या जेवणाच्या ताटाखाली झाडाचे पान ठेवतात आणि उशीखाली थोडेसे सुकलेले गवत ठेवतात. राजस्थानमधील अनेक राजघराण्यांद्वारे त्यांच्या शौर्य आणि धैर्यासाठी त्यांचा आदर केला जातो आणि त्यांची पूजा केली जाते.

महाराणा प्रताप यांचा जन्म पिता महाराणा उदयसिंह आणि माता जयवंताबी यांच्या पोटी, कुंभलगड इथे झाला. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू राजपूत होते.