Laxmi Pujan 2020 Muhurat & Puja Vidhi: लक्ष्मी देवीची कृपादृष्टी कायम राहावी यासाठी कसे कराल लक्ष्मी पूजन? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त, पूजा सामग्री आणि पूजाविधी माहिती असणे गरजेचे आहे.

Varalaxmi Vrat 2020 (Photo Credits: Facebook)

Laxmi Pujan 2020 Puja Muhurat: यंदाची दिवाळी दिसायला खूप छोटी वाटत असली तरी खूप उत्साहाची आणि आनंदाची असणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. यंदा नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) आणि लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) एकाच दिवशी आल्याने सुट्ट्या जरी कमी झाल्या असल्या तरी त्या दिवसाचा उत्साह मात्र द्विगुणित झाला आहे. यंदा दिवाळीचा दिवस हा खास आहे. कारण सुमारे 17 वर्षांनंतर सर्वार्थसिद्धि योग देखील याच दिवशी आहे. असा योग यापूर्वी 2003 साली आला होता असं सांगितलं जातं. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबरला देवी लक्ष्मी यथासांग पूजा करणे,आरती करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त, पूजा सामग्री आणि पूजाविधी माहिती असणे गरजेचे आहे.

14 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त:

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा 14 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी सुरु होणार असून रात्री 8 वाजून 15 मिनिटांपर्यंत राहणार आहे. यातही शक्य असल्यास संध्याकाळी 5.49 वाजल्यापासून 6 वाजून 02 मिनिटांपर्यंत पूजा करावी असे पंचांगात म्हटले आहे. या चांगला योग असल्याचे सांगितले जात आहे. हेदेखील वाचा- Diwali 2020: यंदा दिवाळीच्या दिवशी 17 वर्षांनंतर सर्वार्थसिद्धि योग; पुष्य नक्षत्रापासून दिवाळी पर्यंत महत्त्वाच्या खरेदीचे 7 शुभ मुहूर्त!

पूजेसाठी लागणारे साहित्य:

लक्ष्मीपूजनासाठी दिवा, हळद-कुंकू, अगरबत्ती, कापसाची वस्त्रे, तांदूळ, नारळ, सुटे पैसे, दागिने, केरसुणी, रांगोळी,कवड्या,तांब्याचा शिक्का,मंगल कलश,श्रीयंत्र, कमळ वा झेंडूचे फुलं आणि देवीसाठी गोडाचा नैवेद्य असणे गरजेचे आहे.

लक्ष्मीपूजनाचा विधी:

लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. तसेच तांब्यात श्रीफळ ठेवून त्याच्या बाजून पाच आंब्याची पाने ठेवतात. लक्ष्मीची मूर्ती पाटावर ठेवून पाटाच्या बाजूने केळीची पाने लावली जातात. तसेच घरातील सर्व सोन्याचे दागिने, पैसे, आदी सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला फराळाचा आणि लाह्या-बत्तास्यांचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहावे, अमावस्येला ‘लक्ष्मी’ आणि ‘कुबेर’ या देवतांचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे तर, कुबेर हा संपत्ती संग्रहक असल्याचे म्हटले जाते. तसेच या खास दिवशी नवीन केरसुणीची पूजा केली जाते.

असं म्हणतात या केरसुणीने घरातील कचरा बाहेर टाकला जातो तसाच आपल्यातील वाईट सवयी, विचार बुद्धिबाहेर टाकले जावेत यासाठी प्रार्थना केली जाते. अशा पद्धतीने साग्रसंगीत माता लक्ष्मी देवीची पूजा केल्यास लक्ष्मीची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहील.