Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा विसर्जन;गिरगाव चौपाटीवर साश्रूपूर्ण नयनांनी बाप्पाला निरोप

या वेळी भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. त्यांनी साश्रुपूर्ण नयनांनी बाप्पाला निरोप दिला.

Lalbaugcha Raja First Look HD Images 6 (फोटो सौजन्य - ANI)

तमाम गणेशभक्तांच्या उपस्थितीत लालबागचा राजा (Lalbaugcha Raja Visarjan 2024) आज (18 सप्टेंबर) निरोपकर्ता झाला. मुंबई (Mumbai) येथील गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) येथे असंख्य गणेशभक्तांनी साश्रुपूर्ण नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. काल (17 सप्टेंबर) सकाळी साधारण 11 वाजलेपासून सुरु झालेली गणेशविसर्जन मिरवणूक (Lalbaugcha Raja Visarjan Procession) अखेर आज सकाळी 10.00 वाजणेच्या सुमारास संपली. तब्बल 19-20 तासांपासून अधिक काळ चाललेली ही मिरवणूक लालबाग (Lalbaug), भारतमाता सिनेमा, लालबाग,चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, कुंभारवाडा,सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी.टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा विविध मार्गांवरुन निघाली. ज्याची सांगता गिरगाव चौपाटीवर झाली.

गिरगाव चौपाटीवर भक्तांची गर्दी

लालबागचा राजा गणपती विसर्जन हा एक नेत्रदीपक सोहळा मानला जातो. प्रदीर्घ काळ चाललेली मिरवणूक अखेर गिरगाव चौपाटीवर येते. याठिकाणी आगमन होताच भव्य गणेशमूर्तीची विधवत पूजा आणि सामूहिक महाआरती केली जाते. ही आरती आणि पूजा संपल्यानंतर बाप्पांची भव्य मूर्ती एका मोठ्या तराफ्यावर ठेऊन समूद्रात दूरवर नेली जाते. त्यानंतर खोल समूद्रात तिचे विसर्जन करण्यात येते. बाप्पांना खोल समूद्रात घेऊन जाण्यासाठी मुंबईचे कोळी बांधव मोठ्या उत्साहाने तयारीला लागलेले असतात. ते आपल्या होडी बाप्पांच्या मूर्तीसोबत खोल समूद्रात घेऊन जातात आणि बाप्पांना निरोप देऊन परत येतात. (हेही वाचा, Lalbaugcha Raja 2024 Visarjan Live Streaming: लालबागचा राजा विसर्जन मिरवणूकीला सुरूवात, मुख्यद्वारावर भाविकांची तुफान गर्दी; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video))

गणरायाला साश्रू नयनांनी निरोप

लालबागचा राजा गणपती विसर्जनावेळी मंडळाचे कार्यकर्ते, भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. तब्बल दहा दिवसांचा पाहूणचार घेतल्यावर बाप्पांचे विसर्जन केले जाते तेव्हा भक्त आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्येही दु:खाची छाया उमटते. अनेकांना आश्रू अनावर होतात. त्यामुळे हे भक्त लाडक्या गणरायाला साश्रू नयनांनी निरोप देतात. (हेही वाचा, Lalbaugcha Raja Mandal: लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा माजोरडेपणा कायम; व्हीआयपी आणि सामान्य भाविकांमध्ये भेदभाव केल्याबद्दल तक्रार दाखल)

सेलिब्रेटी बाप्पा आणि अंबानी कुटुंबाकडून सोन्याचा मुकूट

लालबागचा राजा गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्यांपासून ते अनेक उद्योजक, राजकारणी आणि सेलिब्रेटी मंडळींमध्येही त्याची क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळेच मग अनेक सिनेतारका, खेळाडू, सत्ताधारी राजाच्या दरबारी दाखल होतात. राजाच्या चरणी दानही मोठ्या प्रमाणावर होते. महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या वर्षी अंबानी कुटुंबाने लालबागच्या राजाला तब्बल 20 किलो सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. त्यानंतर अंबानी कुटुंबातील सदस्य जवळपास पाच वेळा दर्शनास आल्याचे पाहायला मिळाले.

लालबागच्या राजाला निरोप देताना भक्तांना अश्रू अनावर

दरम्यान, लालबागच्या राजापाठोपाठ चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक मंडळाचा गणपतीही चौपाटीवर दाखल झाला असून, त्याचेही विसर्जन होणार आहे. समुद्राला आलेल्या भरतीमुळे काही मंडळांच्या गणरायाचे विसर्जन होऊ शकले नाही. ती मंडळे आपल्या बाप्पांचे आज विसर्जन करणार आहेत.