Lalbaugcha Raja First Look 2023: प्रतीक्षा संपली! समोर आली लालबागचा राजाची पहिली झलक; पहा फोटो आणि व्हिडिओ
कोळी लोक आणि इतर व्यापारी बंधूनी नवस करून हा राजा लालबागमध्ये स्थपन केला. दहा दिवस चालणाऱ्या या गणपती उत्सवादरम्यान, लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक जमतात, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्सपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांचा सहभाग असतो.
गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2023) अवघे काही दिवस उरले आहेत. त्यासाठीची तयारीही जोरात सुरू आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ‘गणेश चतुर्थी’ साजरी केली जाते. यंदा 19 सप्टेंबर रोजी हा उत्सव साजरा केला जाईल व या दिवशी घरोघरी गणपतीचे आगमन होईल. दरवर्षी महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. यावेळी देश-विदेशातील भाविक विविध मंडळांच्या गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. देशातील लोकप्रिय मंडळांमध्ये मुंबईतील लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja 2023) नाव पहिले घेतले जाते.
नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ओळख आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी लोकांना लालबागच्या राजाचे पहिले दर्शन घडते. आज शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 संध्याकाळी 7 वाजता यंदाच्या लालबागच्या राजाची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळाली. लालबागच्या राजाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत YouTube चॅनलवर पाहता येईल.
लालबागच्या राजाच्या मंडळाची स्थापना सन 1934 मध्ये सध्याच्या ठिकाणी (लालबाग, परळ) येथे करण्यात आली होती. देशाचा स्वातंत्र्यलढा उत्कर्षावर होता तेव्हापासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. स्वातंत्र्यानंतर त्याची भव्यता वाढत गेली. हळूहळू त्याची कीर्ती देशभर पसरली. लालबागचा राजाचे यंदाचे हे 90 वे वर्ष असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे पाद्य पूजन म्हणजेच, गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार 7 जून 2023 रोजी सकाळी 6 वाजता करण्याता आले. तसेच मंडप पूजन मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाले. (हेही वाचा: Eco-friendly Lord Ganesha idol: गणेश चतुर्थीच्या आधी मुंबईत पर्यावरणपूरक 18 फूट कागदी गणेशमूर्तीची तयारी सुरू)
लालबागचा राजा हा मूळ नवसाने स्थापन करण्यात आला. कोळी लोक आणि इतर व्यापारी बंधूनी नवस करून हा राजा लालबागमध्ये स्थपन केला. दहा दिवस चालणाऱ्या या गणपती उत्सवादरम्यान, लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक जमतात, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्सपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांचा सहभाग असतो. दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक किलोमीटरची लांब रांग लागते.