Khandoba Navratri 2019: जेजुरी गडावर आजपासून खंडोबा नवरात्रोत्सवाला सुरुवात; असा असेल संपूर्ण कार्यक्रम

आज सकाळी गडावर घटस्थापना झाली, व आता पुढील 8 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

जेजुरी (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा अनेक ठिकाणच्या भक्तांचे कुलदैवत म्हणून खंडोबाकडे (Khandoba) पहिले जाते. त्यात जेजुरीच्या खंडोबाचे विशेष महत्व आहे. अशा या खंडेरायाचाही नवरात्र उत्सव (Navratri 2019) साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र साजरे होतात. यावर्षी हा उत्सव 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2019 दरम्यान साजरा केला जाणार आहे. जेजुरी गडावर आजपासून चंपाषष्ठीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. आज सकाळी गडावर घटस्थापना झाली, व आता पुढील 8 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

मणीसूर व मल्लासूर या दैत्यांसोबत शंकराने खंडोबाचे रूप घेऊन 6 दिवस युद्ध केले. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला हे युद्ध सुरु झाले होते. ज्या दिवशी हे युद्ध संपले तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी. या उत्सवाच्या निमित्ताने जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान, उजरी, सेवक व देवस्थानच्या वतीने उत्सवाचे आयोजन केले जाते. आज सकाळी घटस्थापणा झाली, त्यानंतर सहा दिवस गडावर मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाणार आहे. उद्यापासून मार्तंड विजय ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात होईल. त्यानंतर शनिवारी सहस्त्रनाम योग व विशेष असा देवाची देव दिवाळी फराळ कार्यक्रम पार पडेल. रविवारी गावात तेलहंडा मिरवणूक निघेल. त्याच रात्री देवाला हळद लावायचा कार्यक्रम पार पडेल.

(हेही वाचा: Khandoba Navratri 2019: सहा दिवस थाटात साजरी होते खंडोबाची नवरात्री; जाणून घ्या चंपाषष्ठीचे महत्व आणि पूजा विधी)

त्यानंतर सोमवारी, 2 डिसेंबर रोजी घट उठल्यावर नवरात्रोत्सवाची सांगता होईल. याच दिवशी हवन आणि अभिषेकाचे कार्यक्रमही पार पडतील. यादिवशी ठोम्बरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण या पदार्थांचा नैवेद्य केला जातो. या सहाही दिवशी दररोज वाघ्या मुरळीचे कार्यक्रम तसेच सनई चौघडा वादन होणार आहे. नवरात्राच्या सहाही दिवस खंडोबासमोर नंदादीप अखंड तेवत ठेवतात. नवरात्राप्रमाणेच यावेळी रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. प्रत्येक दिवशी खंडोबाला बेल, दवणा, झेंडूची फुले, भंडारा वाहून पूजा केली जाते. अशा प्रकारे जेजुरी गडावर मोठ्या उत्साहात चंपाषष्ठीचा उत्सव पार पडेल.