Kartiki Ekadashi 2024: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचं विठ्ठल रूक्मिणी मंदिर 24 तास दर्शनासाठी राहणार खुले

महानैवेद्य समर्पित करण्यासाठी रू.7,000/- देणगी देऊन त्यांना सहभागी होता येईल.

Photo Credit -X

महाराष्ट्रामध्ये विठू भक्तांना आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं (Kartiki Ekadashi) विशेष महत्त्व आहे. आषाढी नंतर चातुर्मासाची सांगता कार्तिकी एकादशीने केली जाते. यंदा कार्तिकी एकादशी 12 नोव्हेंबर दिवशी आहे. या निमित्ताने पंढरपूरात (Pandharpur)  मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या सोयीसाठी आता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन (Vitthal Rukmini Darshan) 24 तास खुले राहणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली आहे. उद्यापासून (4 नोव्हेंबर) कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले असणार आहे.

कार्तिकी यात्रेनंतर देवाची प्रक्षाळ पूजा 20 नोव्हेंबरला होणार असून यानंतर देवाचे 24 तास दर्शन व्यवस्था बंद होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विठ्ठल रूक्मिणीची नित्य पूजा, नैवेद्य, पोशाख, लिंबू पाणी वगळता सुमारे 22 तास देवाचं दर्शन खुले राहणार आहे.

विठ्ठल रूक्मिणीला महानैवेद्य देण्याच्या योजनेमध्येही भाविकांना आता सहभागी होता येणार आहे. महानैवेद्य समर्पित करण्यासाठी रू.7,000/- देणगी देऊन त्यांना सहभागी होता येईल.  2025 च्या 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर पर्यंतचे बुकिंग सुरू झाले आहे. नक्की वाचा:  Viral Video: दानशुर भाविकाकडून विठ्ठल चरणी 50 लाख किंमतीची सोन्याची घोंगडी अर्पण, पहा व्हिडिओ .

आषाढी एकादशी प्रमाणेच कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा पार पडते. ही पूजा उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते केली जाते. त्यांच्यासोबत सामान्य वारकरी जोडपे देखील सहभागी होते.  वारकरी पालख्या घेऊन कार्तिकी एकादशी दिवशी पंढरपूरामध्ये दाखल होतात. ज्या भक्तांना कार्तिकी निमित्त विठ्ठलाचे पंढरपूरात दर्शन घेणं शक्य नसतं त्यांना ऑनलाईन  माध्यमातून देखील घरबसल्या दर्शन घेण्याची देखील सोय आहे.