Hanuman Jayanti 2019: भारतातील विविध राज्यात 'हनुमान जयंती' च्या तारखांमध्ये तफावत! पाहा कधी कुठे साजरी केली जाते हनुमान जयंती
Hanuman Jayanti 2019 Dates: प्रभू रामचंद्रावर (Lord Ram) निस्सीम भक्ती करणाऱ्या हनुमंताचा जन्म महोत्सव म्हणजेच हनुमान जयंती (Hanuman Jayanti) देश विदेशात दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. खोडकर स्वभाव व अमाप शक्तीचे समीकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाला रामायणात व परिणामी लाखो भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त झालेलं आहे. पवनपुत्र हनुमानाला मर्कट (monkey) चेहरा प्राप्त असून त्यात शंकराचा (Lord shiva)अंश असल्याचं मानलं जातं. येत्या १९ एप्रिलला येऊ घातलेल्या हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निम्मिताने भारतातील वेगवेगळ्या राज्यांच्या परंपरेनुसार पार पडणाऱ्या रामभक्त हनुमानाच्या (Hanuman) पूजेच्या (Rituals) प्रकाराविषयी जाणून घेऊयात.
तारखेचा संभ्रम कायमच
तिथीनुसार आणि वेस्टर्न कॅलेंडर प्रमाणे होणाऱ्या संत किंवा महापुरुषांच्या जयंतीच्या तारखांचा गोंधळ व त्यावर आधारित वादविवाद आजवर अनेकदा पाहायला मिळाले आहेत. मात्र प्रत्यक्ष पवनपुत्र हनुमानाची जयंती देखील भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाते.
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाल्याचं मानलं जातं पण देशातील अनेक ठिकाणी भौगलिक विविधतेच्या कारणास्तव हनुमान जयंतीच्या तारखांसंदर्भात संभ्रम आढळून येतो. Hanuman Jayanti 2019: हनुमान जयंती का साजरी केली जाते? जाणून घ्या हनुमानाची जन्मकथा
उत्तर भारतातील वाराणसीच्या संकट मोचन मंदिर व अयोध्येच्या हनुमान ग्रही मंदिर या प्रसिद्ध ठिकाणांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात एप्रिल-मे महिन्यात हनुमान जयंती साजरी केली जाते. (यंदाची तारीख- १९ एप्रिल २०१९) याउलट केरळ व तामिळनाडू राज्यांमध्ये मार्गशिष महिन्यात म्हणजेच साधारण डिसेंबर ते जानेवारी दरम्यान हनुमान जयंतीचे उत्सव आयोजित केले जातात .(यंदाची तारीख-५ जानेवारी २०१९) याशिवाय तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये वैशाख महिन्यातील अमावस्येच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाल्याचं मानलं जातं, तर आंध्र प्रदेश मध्ये अमावास्येपासून ४१ दिवसांच्या उत्सवाचं आयोजन करून जयंती साजरी करण्याची परंपरा आहे.
ओरियाच्या परंपरेनुसार हनुमान जयंतीचा दिवस हा बैसाख महिन्यातील विशुभ संक्रांतीचा पहिला दिवस असल्याचं मानण्यात येतं. राज्यांमधील परंपरांची तफावत वगळता विविध समुदायांमध्ये दिवाळीची नांदी ही हनुमान जयंतीच्या उत्सवाने होत असल्याचे आढळून येते.
हनुमान जयंती 2019
19 एप्रिल
हनुमान जयंती तिथि - शुक्रवार, 19 एप्रिल,2019
पौर्णिमा तिथि आरंभ - 19:26 (18 एप्रिल 2019)पासून
पौर्णिमा तिथि समाप्त -16:41 (19 एप्रिल 2019) पर्यंत
अशी करा हनुमान जयंतीची पूजा
हनुमान जयंतीच्या निम्मिताने अनेक सामाजिक मंडळांकडून तसेच घरगुती स्तरावर पूजेचं आयोजन केलं जातं. काही पारंपरिक पद्धतींसोबतच विविध ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीला बेसननाचे लाडू तसेच लाल रंगाच्या शेवया आणि तुपाचा नैवैद्य चढवण्याची पद्धत आहे.पूजेदरम्यान लाल रंगाची फुले, रुईची पाने, चमेलीचे तेल आणि सुपाऱ्यांचा वापर सर्वाधिक केला जातो. पूजेसोबतच हनुमान चालिसाचे शंभर वेळा पठण तसेच बजरंग गान करण्याची परंपरा सर्वठिकाणी आवर्जून पाळली जाते.
हनुमानाचा जन्म हा सूर्योदयाच्या वेळी झाल्याचं मानण्यात येत असल्याने पूजेच्या विधी पहाटेच्या वेळी पार पाडल्या जातात. पश्चिम भारतात हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी उपवास धरला जातो तर उत्तर भारतात जयंतीच्या दिवशीच व्रत करण्याची पद्धत प्रसिद्ध आहे. हनुमान जयंतीचे व्रत हे मुख्यत्वे पुरुषांकडून तसेच पेहेलवानांकडून अधिक प्रमाणात पाळलं गेल्याचे मागील अनेक वर्षात आढळून आले आहे