Gudi Padwa 2020: यंदा गुढीपाडव्या निमित्त गुढी कशी उभाराल?

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस. पाडवा म्हणजे प्रतिपदा म्हणून त्याला वर्षप्रतिपदा किंवा गुढीपाडवा असे म्हणतात. या नववर्षाला गुढी कशी सजवाल आणि उभाराल? जाणून घ्या.

Gudi Padwa 2020 (Photo Credits: PTI)

हिंदू पंचांगानुसार नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस. पाडवा म्हणजे प्रतिपदा म्हणून त्याला 'वर्षप्रतिपदा' किंवा 'गुढीपाडवा' असे म्हणतात. या दिवसाच्या अनेक कथा आहेत. मात्र याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची रचना केली असे मानले जाते म्हणून हा दिवस नवे संकल्प किंवा नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेला पाडवा यंदा बुधवार, 25 मार्च रोजी आहे. या चैत्र पाडव्याला नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारण्याची प्रथा आहे. या नववर्षानिमित्त मराठमोळ्या घरांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. रांगोळ्या, तोरणे लावून घरं सजवली जातात. गोडाधोडाचे बेत रंगतात. घरातील स्त्रिया तर सजून नटून गुढी उभारण्यासाठी सज्ज होतात.

पूर्वी मोठी घरे, अंगण असल्याने संपूर्ण अंगण शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढून पाट मांडला जातो. त्यानंतर त्यावर गुढी सजवून उभी केली जाते. अजूनही गावाकडे हीच पद्धत आहे. मात्र शहरांमध्ये जागे अभावी खिडकीत किंवा दारात गुढी उभारावी लागते. ही गुढी नेमकी कशी उभारावी, कशी सजवावी? जाणून घेऊया...

# सर्वप्रथम गुढी ज्या ठिकाणी उभारणार आहात ती जागा स्वच्छ करुन घ्या. त्यावर सुरेख रांगोळी काढा. रांगोळीत रंग भरा किंवा भरणार नसल्यात तर त्यावर हळद कुंकू घाला. गुढी पाडवा निमित्त सहज सोप्या रांगोळ्या दारात काढून करा चैत्र पाडव्याचं स्वागत!

# गुढी उभारण्यासाठी रेशमी वस्त्र, कडूलिंबाची पाने, बत्ताशांची माळ, कलश, हार या गोष्टींची आवश्यकता असते. काठीला रेशमी वस्त्र, कडूलिंबाची पाने, बत्ताशांची माळ बांधा.

# त्यानंतर कलशावर स्वतिक काढून तो कलश काठीवर पालथा ठेवा. त्यानंतर गुढीला हार घाला. काही ठिकाणी चाफ्याच्या फुलांचा हार घालण्याची पद्धत आहे.

# गुढी उभारा आणि त्यानंतर हळद-कुंकू, अक्षता, फुलं वाहून गुढीची मनोभावे पूजा करा. दिवा, अगरबत्ती ओवाळा. तसंच तुमच्याही यशाची, आनंदाची, आरोग्याची आणि समृद्धीचीही गुढी अशीच उंच जावी म्हणून गुढीकडे प्रार्थना करा.

# गुढीला घरी बनवलेल्या गोडाधोडाचे नैवेद्य दाखवले जाते आणि पूजेनंतर कडूलिंब-साखरेचा प्रसाद खाल्ला जातो. सुर्यास्तापूर्वी गुढी उतरवली जाते.

युद्धात रावणाचा पराभव करुन प्रभू रामचंद्र सीता आणि लक्ष्मणासमवेत अयोध्येला परतले तो दिवस वर्षप्रतिपदेचा होता. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. तेव्हापासून गुढी उभारण्याची परंपरा सुरु झाली असे मानले जाते. यंदा गुढीपाडव्याच्या सणावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. मात्र घरच्या घरी गुढी उभारुन तुम्ही नवर्षाचा आनंद नक्कीच साजरा करु शकता.