Gudi Padwa 2019: गुढीपाडव्यासाठी खास घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड कसे बनवाल? जाणून घ्या रेसिपी
तर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येते.
Gudi Padwa 2019: गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. तर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येते. तसेच गोडाधोडाच्या पदार्थांची मेजवानी घरातील मंडळींना या दिवशी खाण्यासाठी मिळते. तर गुढीपाडव्यासाठी खास नैवेद्य बनवला जातो. या जेवणामध्ये कांदा लसूणचा उपयोग न करता जेवण सात्विक पद्धतीने बनविले जाते.
पाडव्याला घरात गोड पदार्थ म्हणून पुरणपोळी किंवा श्रीखंडाचा समावेश जेवणात असतो. त्यामुळे आज पाहूयात घरच्या घरी सोप्या पद्धतीने विविध प्रकारे श्रीखंड कसे बनवावे.
(हेही वाचा-Gudi Padwa 2019: गुढीपाडव्या निमित्त पूजा विधी कशी करावी आणि महत्व, जाणून घ्या)
केशर वेलची श्रीखंड:
साहित्य: अर्धा किलो दही, 10-15 नग वेलची, 150 ग्रॅम साखर किंवा पीठी साखर आणि रंगासाठी केशर
कृती: एका सुती कापडात सर्व प्रथम दही घट्ट बांधून घ्यावे. त्यानंतर दह्यामधील सर्व पाणी निघून जाई पर्यंत सुती कापडाची पुरचुंडी तशीच बांधून ठेवा. साधारण 8 तासापेक्षा जास्त वेळ ही पुरचुंडी तशीच ठेवा. त्यानंतर बांधलेल्या दह्याची पुरचुंडी सोडावी. तयार झालेला हा चक्का एका बाऊल मध्ये काढा. तसेच वेलचीची बारीक पूड करा. असे सर्व केल्यानंतर चक्का असणाऱ्या बाऊलमध्ये पिढीसाखर आणि वेलची घातल्यानंतर हे मिश्रण एकत्र करा. पीठीसाखर विरघळेपर्यंत ते मिश्रण फेटत रहावे. त्यानंतर शेवटी केशर टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करा. केशर या मिश्रणात घातल्यामुळे त्याचा रंग बदलण्यास सुरुवात होतो. तर केशर बदामी रंग आल्यानंतर तुमचे घरच्या घरी श्रीखंड तयार झाले. गरमा गरम पुऱ्यांसह श्रीखंड घरातील मंडळींना सर्व्ह करा.
राजभोग श्रीखंड:
साहित्य: दही, एक कप दूध, केशर, सुकामेवा, साखर
कृती: दहीचा चक्का बनवून घ्या. त्यानंतर एक कप दूधात केशर टाकून ते अर्ध्या तासासाठी तसेच ठेवा. सुकामेवा मध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड तुम्हाला हवे त्या गरजेप्रमाणे वापरावे. दह्याच्या चक्का केलेल्या भांड्यात आता प्रथम सुकामेवा, साखर टाकावी. मिश्रण चांगले फेटून घेतल्यानंतर शेवटी केशरयुक्त दूध त्यामध्ये टाकावे. हे सर्व मिश्रण उत्तम प्रकारे फेटून घेतल्यानंतर तुमचे श्रीखंड तयार होईल.
मँगो श्रीखंड :
साहित्य: दह्याच्या चक्का 250 ग्रॅम, पीठीसाखर 250 ग्रॅम, आंब्याचा रस, अर्धा चमचा वेलची पूड, 3-4 चमचे दूध आणि जायफळ
कृती: एका बाऊल मध्ये दह्याचा चक्का पुन्हा एकदा फेटून घ्या. म्हणजे त्यामधील काही गुठल्या असल्यास त्या निघून जातील. यामध्ये नंतर पीठीसाखर टाका. तसेच तीन ते चार चमचे दूध घालून हे मिश्रण फेटून घ्या. त्यानंतर मिश्रण फेटून झाल्यावर आंब्याचा रस सुद्धा त्यामध्ये मिक्स करा. पुन्हा एकदा हे मिश्रण फेटताना त्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकून 5-10 मिनिटे फेटावे. तसेच आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुटचा ही वापर करु शकता.
तर यंदाच्या पाडव्याला नक्की घरी श्रीखंडाचा घरच्या घरी बेत करा. तसेच गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा!!!