सुबोध भावेच्या कुटुंबात चक्क ATM मधून मिळतो गणपतीचा प्रसाद
पुण्यातील ATM मधून प्रसाद देणार्या गणपतीचा व्हिडिओ व्हायरल, सुबोध भावेने शेअर केला खास व्हिडिओ
गणपती बाप्पा ही मूळातच बुद्धीची देवता आहे. यंदा इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. थर्माकोलचे मखर हटवल्याने यंदा अनेकांनी आपल्या क्रिएटीव्हिटीला थोडी चालना देऊन हटके पद्धतीने गणपतीसाठी आरास केली. पुण्यामध्ये एका गणेशभक्ताने गणपती बाप्पाला चक्क एटीएम मशीनमध्ये बसवले आहे.
पुण्यात अनोखी आरास
पुण्यामध्ये अभिनेता सुबोध भावेच्या आतेभावाकडे खास आरास करण्यात आली आहे. या आरासीमध्ये बाप्पाला एका एटीएम मशीनमध्ये बसवण्यात आले आहे.
गणपती बाप्पाचं हे अनोखं एटीएम मशीन आपल्याला जीवानाचं सारं सांगून जातं. स्वतःच्या गुण, अवगुणांवर मात करून बाप्पाकडे आर्शिवाद मागितल्यानंतर चक्क या एटीएम मशीनमधून डब्बीत मोदकाचा प्रसाद मिळतो. खास तंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या मदतीने सुबोधचा भाऊ संजय कुलकर्णींनी ही अनोखी आरास केली आहे. गेली अनेक वर्ष संजय अशाचप्रकारे कल्पक आयडियांचा वापर आरास करत असल्याचं त्यांने सांगितले आहे.
फेसबूकवर या गणपती बाप्पाच्या प्रसाद देण्याच्या हटके स्टाईलचा व्हिडिओ सुबोधने शेअर केला आहे. त्यानंतर सोशल मीडियात तो झपाट्याने व्हायरलही झाला आहे.