February Month Festivals and Special Days: मराठी लोकांसाठी फेब्रुवारी महिना आहे खास; जाणून घ्या या महिन्यात साजरे होणारे सण आणि काही खास दिवस
अशा परिस्थितीत धर्म, श्रद्धा आणि ग्रह-नक्षत्र दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिन्याचे विशेष महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात येणारे प्रमुख सण व काही खास दिवस
February Month Marathi Festivals and Special Days: माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीपासून फेब्रुवारी महिना (February Month) सुरू होत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार 2024 चा दुसरा महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मानला जातो. या महिन्यात मौनी अमावस्येचे मोठे स्नान होणार असून, या महिन्यात गुप्त नवरात्रीलाही सुरुवात होणार आहे. यासोबतच फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमी, रथ सप्तमी, माघ पौर्णिमा इत्यादी अनेक प्रमुख व्रतवैकल्ये येणार आहेत. मराठी लोकांसाठी फेब्रुवारी महिना खास आहे, कारण या महिन्यात सण-उत्सावासोबतच काही महत्वाचे दिवसही साजरे होणार आहेत.
दुसरीकडे, या महिन्यात 4 पैकी काही ग्रह आपली राशी बदलणार आहेत. अशा परिस्थितीत धर्म, श्रद्धा आणि ग्रह-नक्षत्र दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिन्याचे विशेष महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात येणारे प्रमुख सण व काही खास दिवस आणि त्यांचे महत्त्व-
- तिथीनुसार स्वामी विवेकानंद जयंती- 2 फेब्रुवारी
- मणेराजुरी यल्लम्मा देवी यात्रा- 2 फेब्रुवारी
सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी या ठिकाणी यल्लम्मा देवीची यात्रा पौष महिन्यात भरते.
- वीर तानाजी मालुसरे स्मृतिदिन- 4 फेब्रुवारी
तानाजी मालुसरे यांनी कोंढाणाच्या (सध्याचा सिंहगड) लढाईत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा या थोर सेनानीचा रविवार, 4 फेब्रुवारी रोजी स्मृतीदिन आहे.
- षटतिला एकादशी- 6 फेब्रुवारी
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला शट्टीला एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तिळाचा विशेष वापर केला जातो. असे मानले जाते की, या दिवशी विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा केल्याने मोक्षाचे दरवाजे उघडतात आणि तिळाचे दान केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते.
- मौनी अमावस्या- 9 फेब्रुवारी
मौनी अमावस्या ही माघ महिन्यातील अमावस्या आहे. या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्येबद्दल असे सांगितले जाते की, या दिवशी गंगेत श्रद्धेने स्नान केल्याने जन्मातील सर्व पापे धुतली जातात. (हेही वाचा: Indian Coast Guard Day 2024 Message: भारतीय तटरक्षक दिनानिमित्त खास Wishes, WhatsApp Status, Greetings शेअर करत द्या शुभेच्छा)
- गुप्त नवरात्रीची सुरुवात- 10 फेब्रुवारी
माघ आणि आषाढमध्ये हे गुप्त नवरात्र साजरे केले जातात. या दिवशी दुर्गा देवीच्या 10 महाविद्यांची पूजा केली जाते.
- माघी गणेश जयंती- 13 फेब्रुवारी
गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते.
- वसंत पंचमी- 14 फेब्रुवारी
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. ज्या दिवशी वसंत ऋतु सुरू होतो तो दिवस वसंत पंचमीचा सण म्हणून साजरा केला जातो. वसंत पंचमी किंवा श्री पंचमी या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. धर्मग्रंथांमध्ये, वसंत पंचमीचा उल्लेख ऋषी पंचमी म्हणून करण्यात आला आहे,
- विठ्ठल-रुक्मिणी विवाह- 14 फेब्रुवारी
वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहलेल्या रुक्मिणी स्वयंवरात केलेला आहे. दरवर्षी पंढरपूर येथे हा विवाहसोहळा थाटामाटात पार पडतो.
- रथसप्तमी- 16 फेब्रुवारी
रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते.
- जागतिक सूर्यनमस्कार दिन- 16 फेब्रुवारी
दरवर्षी माघ महिन्यातील रथ सप्तमी या तिथीला जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो.
- दादासाहेब फाळके स्मृतिदिन- 16 फेब्रुवारी
भारतीय सिनेमाचे जनक मानले जाणारे धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा 16 फेब्रुवारीला पुण्यादिन.
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती- 19 फेब्रुवारी
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. शिवाजी महाराज हे पहिले छत्रपती आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
- जया एकादशी- 20 फेब्रुवारी
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.
- पंढरपूर माघ वारी- 20 फेब्रुवारी
पंढरपुरात आषाढी, कार्तिकीनंतर जया एकादशीला माघ वारी असते. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे दाखल होतात.
- गोंदवलेकर महाराज जयंती- 21 फेब्रुवारी
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकी श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके 1766 (इ.स. 1845) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला.
- गुरुपुष्यामृत योग- 22 फेब्रुवारी
जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार आणि रविवारी येते तेव्हा त्याला अनुक्रमे गुरु पुष्यामृत योग आणि रवि पुष्यामृत योग म्हणतात. हे दोन्ही योग धनत्रयोदशी आणि चैत्र प्रतिपदेसारखे शुभ आहेत. ग्रहांची प्रतिकूल स्थिती असूनही हा योग फार शक्तिशाली आहे. याच्या प्रभावाखाली सर्व वाईट परिणाम दूर होतात.
- संत गाडगे बाबा जयंती- 23 फेब्रुवारी
गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव येथे झाला होता.
- विनायक दामोदर सावरकर स्मृतीदिन- 26 फेब्रुवारी
विनायक दामोदर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 26 फेब्रुवारी 1966 वयाच्या 83 व्या वर्षी मृत्यू झाला.
- मराठी भाषा गौरव दिन- 27 फेब्रुवारी
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, 27 फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.