Diwali 2020: शुभ आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या धनतेरस सणाच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' 10 वस्तूंची खरेदी
जर एखाद्याने तुम्हाला या निषिद्ध वस्तू भेट म्हणून दिल्या असतील तर या वस्तू घरी आणणे टाळायला हवे. धनतेरसच्या दिवशी खालील वस्तू खरेदी करू नका.
Diwali 2020: कार्तिक कृष्णपक्षाच्या त्रयोदशीच्या दिवशी धनतेरस (Dhanteras) चा सण साजरा केला जातो. यावर्षी, त्रयोदशी 12 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजेपासून दुसर्या दिवशी 05.59 पर्यंत असणार आहे. यानंतर चतुर्दशी तिथीला प्रारंभ होईल. म्हणूनचं, 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05:59 पूर्वी धनतेरस साजरा केला जाऊ शकतो. धनतेरसचा सण संपत्ती आणि आरोग्याशी संबंधित आहे. या दिवशी कुबेरची संपत्तीसाठी तर धन्वंतरीची आरोग्यासाठी पूजा केली जाते. या दिवशी मौल्यवान धातू, नवीन भांडी आणि दागिने खरेदी करण्याची प्रथा आहे.
मात्र, धनतेरसच्या दिवशी अशा बर्याच वस्तू आहेत ज्या या दिवशी खरेदी करणं अशुभ मानलं जातं. जर एखाद्याने तुम्हाला या निषिद्ध वस्तू भेट म्हणून दिल्या असतील तर या वस्तू घरी आणणे टाळायला हवे. धनतेरसच्या दिवशी खालील वस्तू खरेदी करू नका. (हेही वाचा - Diwali 2020: धनतेरस च्या दिवशी का खरेदी करतात सोने-चांदी किंवा तांब्या-पितळाची भांडी? जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त)
धनतेरसच्या दिवशी या वस्तू खरेदी करू नका -
लोह -
धनतेरसच्या दिवशी घरी लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत. जर तुम्हाला अगदी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असेल, तर तुम्ही धनतेरसच्या आधी एक दिवस त्या वस्तू खरेदी करू शकता. परंतु, धनतेरसच्या दिवशी कोणत्याही स्वरूपातील लोखंड खरेदी न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्टील -
अनेकजण धनतेरसच्या दिवशी स्टीलची भांडी खरेदी करतात. मात्र, स्टील लोखंडाचा एक प्रकार असल्याने या दिवशी स्टीलची भांडी खरेदी करणं टाळावं. त्याऐवजी तुम्ही तांबे किंवा कांस्याच्या वस्तू खरेदी करू शकता.
रिकामी भांडी -
हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की, रिकामे भांडे, कलश, कुंड किंवा इतर भांडी घरात रिकामे आणू नयेत. म्हणूनचं, जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही भांडी विकत घेत असाल, तर यात तुम्ही तुप, बटाशे आणि रेवडी यासारख्या वस्तू ठेवूनचं ते घरात आणा. हे शुभ मानले जाते.
धारदार वस्तू -
धनतेरस खरेदी करताना शक्य असल्यास चाकू, सूरी, कात्री, वस्तरा, यासारख्या धारदार वस्तू खरेदी करू नका किंवा घरी आणू नका.
कार -
अनेक लोक धनतेरसच्या दिवशी नवीन गाड्या खरेदी करतात. हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. परंतु, शक्य असल्यास नवीन गाडी खरेदी केल्यानंतर गाडीचे पैसे एक दिवस आधी किंवा एक दिवस नंतर पैसे द्या. धनतेरसच्या दिवशी पैसे देऊन गाडी घरी आणण्यास टाळा.
तेल-
धनतेरसच्या दिवशी कोणीही स्वयंपाकाचे तेल किंवा तूप इत्यादीसारखे इतर पदार्थ विकत घेऊ नये आणि घरी आणू नयेत. या सर्व गोष्टी इतर वस्तूंबरोबर एक दिवस आधी खरेदी केली जाऊ शकतात.
काळ्या वस्तू -
धनतेरसच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. जे खूपचं शुभ मानले जाते. या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू घरात विकत आणू नका. या दिवशी कोणतीही काळी वस्तू खरेदी करणं टाळा.
भेटवस्तू -
धनतेरसच्या एक दिवस आधी भेटवस्तू खरेदी करणे आणि पाठविणे शहाणपणाचे लक्षणं आहे. धनतेरसच्या दिवशी कोणालाही भेटवस्तू देणं टाळा.
काचेच्या वस्तू -
ज्योतिषशास्त्रात काच राहूशी संबंधित असल्याचे मानले जाते. म्हणून धनतेरसच्या दिवशी काचेच्या वस्तू खरेदी करणे टाळले पाहिजे.
बनावट सोने -
धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. पण वास्तविक सोनं खरेदी करण्याइतकेच, बनावट सोनं हे अशुभ ठरू शकतं. म्हणून धनतेरसच्या दिवशी बनावट सोन्याचे बनलेले दागिने, नाणी इत्यादी घरी आणू नयेत.
या सर्व गोष्टी जाणून घेतल्या असल्या तरी सध्याची नवीन पिढी यावर विश्वास ठेवत नाही किंवा हे गांभीर्याने घेत नाही. त्यांना त्यांच्यानुसार विचार करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. यामागे आमचा प्रयत्न केवळ आपण सर्वांनी धनतेरसचा आनंदोत्सव आनंदाने साजरा करावा, हाचं आहे.