Dahi Handi 2023: दहीहंडीसारख्या ‘पवित्र हिंदू सणाचे व्यापारीकरण’; कार्यकर्त्या स्वाती पाटील यांची मानवी मनोऱ्याची मर्यादा निश्चित करण्याची मागणी
मात्र या सणाचे असे व्यापारीकरण फक्त महाराष्ट्रातच पाहायला मिळते. वाढत्या व्यावसायीकरणामुळे आणि निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे हा महोत्सव शोमध्ये बदलला असल्याचे पाटील यांनी अधोरेखित केले.
दहीहंडीसारख्या (Dahi Handi 2023) ‘पवित्र हिंदू सणाचे व्यापारीकरण’ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत, कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी राज्य सरकारला मानवी पिरॅमिडच्या कमी स्तरांची खात्री करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून जीवघेण्या दुर्घटना टाळता येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संस्कृती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लिहिलेल्या पत्रात पाटील यांनी उत्सवाचे वाढते ‘मार्केटिंग’ थांबवणे ही राज्याची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.
भारताच्या सर्व भागांमध्ये दहीहंडी हा धार्मिक आणि पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. मात्र या सणाचे असे व्यापारीकरण फक्त महाराष्ट्रातच पाहायला मिळते. वाढत्या व्यावसायीकरणामुळे आणि निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे हा महोत्सव शोमध्ये बदलला असल्याचे पाटील यांनी अधोरेखित केले.
दरवर्षी दहीहंडीदरम्यान होणाऱ्या जीवितहानीवर प्रकाश टाकताना पाटील म्हणाल्या, ‘यामुळे गेल्या वर्षी काही जणांना जीव गमवावा लागला तर काहींना गंभीर दुखापत झाली. यासाठी फक्त भरपाई देणे पुरेसे आहे का? आर्थिक नुकसान भरपाईने गमावलेल्या जीवनाची भरपाई होऊ शकते का? यावर काही ठोस उपाय करण्याऐवजी सरकार त्यावर फक्त देखरेख करत आहे, असे सांगत हा उत्सव धार्मिकतेने खेळावा, असे आवाहन त्यांनी केले.
या मुद्द्यावर जेव्हा FPJ ने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला तेव्हा एका व्यक्तीने सांगितले की, या विषयावर बैठका सुरू आहेत आणि काही दिवसात निर्णय घेतला जाईल. तसेच दहीहंडी उत्सव समारंभ समितीचे सल्लागार अभिषेक सुर्वे म्हणाले, ‘कोणालाही पत्र लिहिणे हा अधिकार आहे. आम्ही गोविंदांच्या सुरक्षेसाठी सरकारसोबत काम करत आहोत आणि त्यांना विमा कवच मिळवून देण्यास सांगत आहोत. गेल्या आठवड्यात, राज्य सरकारने गोविंदांना लागू असलेल्या 1 लाख ते 10 लाखांपर्यंतच्या विविध विमा संरक्षणांची माहिती देणारा सरकारी ठराव (GR) जारी केला. (हेही वाचा: Mumbai International Festival: पुढील वर्षी 20 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन; अनेक ॲक्टिव्हीटीज, खाद्यपदार्थ, शॉपिंगसह अनुभवायला मिळणार विविध गोष्टी)
दरम्यान, दहीहंडी हा सण 'कृष्ण जन्माष्टमी' नंतर एका दिवसानी साजरा केला जातो. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंचावर टांगले जाते. हंडी फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. महाराष्ट्रात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सुव साजरा केला जातो. यामध्ये पुरूषांसोबतच अनेक महिला देखील सहभाग घेतात.