Chinchpokli Cha Chintamani 2026 First Look Revealed: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लूक पहा; बालाजी रूपातील सजावटीची भाविकांना प्रतीक्षा
आगमन सोहळ्याच्या काही दिवस आधी मंडळाने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये सजावटीत बालाजीचे रूप झळकले होते.
मुंबईतील तरुणाईमध्ये विशेष क्रेझ असणाऱ्या आणि लालबाग-परळ भागातील मुख्य आकर्षण ठरणाऱ्या 'चिंचपोकळीचा चिंतामणी' (Chinchpokli Cha Chintamani) या गणेश मंडळाचा फर्स्ट लूक आज, २९ ऑगस्ट २०२६ रोजी आगमन सोहळ्यादरम्यान भाविकांसमोर आला आहे. यंदा मंडळ आपले १०७ वे वर्ष साजरे करत असून, परळ येथील कलागंध आर्ट्समधून बाप्पाची मूर्ती मंडपाकडे रवाना झाली आहे.
टीझरमधून आधीच मिळाला होता अंदाज
आगमन सोहळ्याच्या काही दिवस आधी मंडळाने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये सजावटीत बालाजीचे रूप झळकले होते. त्यामुळे यंदाची संपूर्ण संकल्पना आणि मूर्तीचे रूप याच धर्तीवर असेल, असा अंदाज भाविकांकडून आधीच व्यक्त केला जात होता. दरवर्षीप्रमाणे मंडळाने अधिकृत आणि सविस्तर रूप आगमन सोहळ्याच्या दिवशीच जाहीर केले.
चिंचपोकळीचा चिंतामणी 2026 ची पहिली झलक
View this post on InstagramA post shared by Chinchpoklicha Chintamani (@chinchpoklichachintamani)
Chinchpokli Cha Chintamani Aagman Sohala 2026 Live इथे पहा
लालबाग-परळ भागात भाविकांची तुफान गर्दी
फर्स्ट लूक पाहण्यासाठी परळ, लालबाग आणि आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमले होते. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गर्दीचा अंदाज घेता पोलिसांकडून परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि वाहतुकीत आवश्यक ते बदल करण्यात आले.
मागील वर्षांची परंपरा
गेल्या काही वर्षांत चिंचपोकळीच्या चिंतामणीने विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक थीमवर आधारित भव्य मूर्ती साकारल्या आहेत. २०२५ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातील सुमारे २१ ते २२ फूट उंचीची मूर्ती भाविकांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरली होती, तर त्याआधीच्या वर्षांतही मंडळाने सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजलेल्या आणि बारकाईने घडवलेल्या मूर्तींद्वारे भाविकांचे लक्ष वेधले होते. सन १९२० मध्ये स्थापन झालेले हे मंडळ मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक मानले जाते.
यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव 12 दिवसांचा
आगमन सोहळ्यानंतर आता मंडपात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे बाप्पाचे आगमन १४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, तिथींमधील बदलामुळे यंदाचा उत्सव नेहमीच्या दहा दिवसांऐवजी १२ दिवसांचा असणार आहे. २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांना निरोप दिला जाईल.