Ganeshotsav 2026 Dates: यंदा सार्वजनिक गणेशोत्सव 10 नव्हे, तर तब्बल 12 दिवसांचा; जाणून घ्या कारण
यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव नेहमीच्या 10 किंवा 11 दिवसांऐवजी थेट 12 दिवसांचा असणार आहे. हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येणे आणि तिथीच्या वाढीमुळे हा बदल घडून आला आहे. बाप्पाचे आगमन 14 सप्टेंबर तर विसर्जन 25 सप्टेंबर रोजी होणार आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव (Ganeshotsav) जितक्या धामधूमीत घराघरांमध्ये असतो तितक्याच उत्सहात किंबहुना त्याहून अधिक जल्लोषात सार्वजनिक मंडळांमध्ये साजरा करण्याची पद्धत आहे. मुंबई, पुणे, नाशिक शहरांमध्ये गल्लोगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आढळतात. या गणपती मंडळांमध्येही अगदी घरच्या बाप्पाप्रमाणे भाविक गणरायाची नित्य पूजा, आरती करतात. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांविरूद्ध समाजात जागृती करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली परंपरा आजही सुरू आहे.
राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा नेहमीपेक्षा दोन दिवस अधिक काळ चालणार आहे. दरवर्षी हा उत्सव साधारणपणे 10 किंवा 11 दिवसांचा असतो, मात्र यंदा पंचांगातील तिथीच्या बदलामुळे 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 12 दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. या बदलामुळे गणेशभक्त आणि सार्वजनिक मंडळांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नक्की वाचा: Chinchpokli Cha Chintamani Aagman Date 2026: चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा यंदा 29 ऑगस्टला.
गणपती बाप्पाचे आगमन कधी?
यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी, म्हणजेच हरतालिकेच्याच दिवशी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. सामान्यतः हरतालिका आणि गणेश चतुर्थी हे दोन वेगवेगळे दिवस असतात, परंतु यंदा तिथीच्या विशिष्ट गणितामुळे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत.
यंदा सार्वजनिक गणेशोत्सव 12 दिवसांचा उत्सव का?
पंचांगकर्त्यांच्या मते, यंदाचा गणेशोत्सव 12 दिवसांचा होण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येणे, तसेच तिथीत झालेली वाढ यामुळे हा बदल घडून आला आहे. तृतीयेपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचे दिवस मोजल्यास 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर असे एकूण 12 दिवस होत आहेत. नक्की वाचा: Mumbaicha Raja 2026 Fake Viral Photos: मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती च्या यंदाच्या रूपाचे AI निर्मित फोटो वायरल; मंडळाने केले भाविकांना महत्त्वाचं आवाहन .
पंचांग अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे की, हा 12 दिवसांचा योग काही दुर्मिळ किंवा असामान्य घटना नाही, तर तिथी गणनेतील नैसर्गिक बदलाचा परिणाम आहे. त्यामुळे भाविकांनी याबाबत संभ्रमित न होता उत्सवाच्या तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
गणपती बाप्पांचे विसर्जन कधी होणार?
सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला विसर्जनाने होते. यंदा 25 सप्टेंबर 2026 रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यभरातील सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन विविध नदी, तलाव आणि कृत्रिम विसर्जन स्थळी केले जाईल.
सार्वजनिक गणेशोत्सवाची पार्श्वभूमी
महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा शतकाहून अधिक जुनी आहे. मूळत: हा सण घराघरांत साजरा केला जात असे, मात्र समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी आणि राष्ट्रीय एकतेची भावना रुजवण्यासाठी हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांतही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
गणेशोत्सव मंडळांची तयारी
उत्सवाचा कालावधी वाढल्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांना आपल्या नियोजनात बदल करावा लागणार आहे. सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजन यासंदर्भात मंडळांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. प्रशासनाकडूनही वाढीव कालावधी लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.
एकूणच, यंदाचा गणेशोत्सव नेहमीपेक्षा दोन दिवस अधिक काळ चालणार असल्याने भाविकांना बाप्पाच्या सान्निध्यात अधिक काळ घालवण्याची संधी मिळणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2026 02:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

