Char Dham Yatra 2024: वैदिक मंत्रोच्चारांमध्ये बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले; पारंपारिक संगीत-नृत्य, भगवान विष्णूच्या जय घोषात भाविक मंत्रमुग्ध
रविवारी सकाळी 6 वाजता वैदिक मंत्रोच्चाराने श्री बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Char Dham Yatra 2024: उत्तराखंड(Uttarakhand)मधील श्री बद्रीनाथ मंदीर आज रविवारी सकाळी 6 वाजता संपूर्ण विधी, वैदिक मंत्र आणि 'बद्री विशाल लाल की जय' च्या जय घोषणांसह भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्री बद्रीनाथ मंदिर(Shri Badrinath temple)चे दरवाजे सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर भाविकांसाठी उघडण्यात आले. श्री बद्रीनाथ धाम हे मंदिर उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील बर्फाच्छादित पर्वतांमध्ये स्थित आहे. बद्रीनाथ मंदिरात प्रवेशासाठी आज पहाटेच हजारो भाविकांनी गर्दी केली होती. प्रवेशद्वार देखील फुलांनी सजवण्यात आले. मंदिराच्या सजावटीसाठी 15 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे.
बद्रीनाथ मंदीर अलकनंदा नदीच्या काठावर चमोली जिल्ह्यातील गढवाल टेकडीवर स्थित आहे, बद्रीनाथ मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. धार्मिक पूजविधी करत मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. हलक्या पावसाच्या सरी, लष्करी बँड, ढोलांचे मधुर सूर, पारंपारिक संगीतात महिलांचे नृत्य पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सर्व भाविकांना या शुभ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. एक्स पोस्टमध्ये सीएम धामी यांनी लिहिले की,"आज भगवान बद्री विशालचे दरवाजे वैदिक मंत्रोच्चार आणि संपूर्ण विधींनी उघडले गेले. चार धाम यात्रेतील सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा! जय बद्री विशाल." त्याशिवाय, मुख्य पुजारी कुलगुरू ईश्वर प्रसाद नंबूद्री यांनी गर्भगृहात भगवान बद्रीनाथांची विशेष प्रार्थना करताना सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
बद्रीनाथ यात्रा ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची यात्रा आहे, प्रामुख्याने भगवान विष्णूंचे भक्त ती आवर्जून करतात. चार धामची तीर्थयात्रा साधारणतः एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला सुरू होते आणि नोव्हेंबरपर्यंत चालते. उत्तराखंडमध्ये १० मे रोजी चार धाम यात्रेला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह तिन्ही धाम गजबजल्या आहेत. पहिल्या दिवशी केदारनाथ धामला देश-विदेशातील 29,000 हून अधिक भाविकांनी विक्रमी भेट दिली.
यात्रेकरूंचे स्वागत करताना, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी श्री केदारनाथ धाम मंदिरातील उद्घाटन पूजेच्या अध्यक्षस्थानी, चार धाम यात्रेला निघालेल्या सर्वांच्या सुरक्षित प्रवास आणि आध्यात्मिक पूर्ततेसाठी प्रार्थना केली.