Chaitra Navratri 2019: चैत्र नवरात्र साजरी करण्यामागील महत्त्व काय?
यंदा 6 एप्रिल (शनिवार) आणि 14 एप्रिल (रविवार) पर्यंत चैत्र नवरात्रोत्सव असणार आहे.
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या आरंभासोबतच चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होईल. यंदा 6 एप्रिल (शनिवार) आणि 14 एप्रिल (रविवार) पर्यंत चैत्र नवरात्रोत्सव असणार आहे. अश्विन महिन्यात देखील नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या नवरात्रोत्सवाप्रमाणे चैत्र नवरात्रोत्सव देखील देशभरात अगदी उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. चैत्र नवरात्रोत्सव का साजरा केला जातो? त्याचे महत्त्व काय? जाणून घेऊया...
चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र यात नेमका फरक काय?
चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र यातील नेमका फरक म्हणजे या दोन्ही नवरात्र वेगवेगळ्या मराठी महिन्यात येत असून चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाला 'वासंतिक नवरात्र' म्हणतात. तर अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला 'शारदीय नवरात्र' असं म्हणतात. दोन्ही नवरात्र उत्सव हे दुर्गा मातेचेच असतात. दोन्ही नवरात्रातीत दुर्गेची पूजा ही "निर्मिती शक्तीची" पूजा असते. शारदीय नवरात्राप्रमाणे चैत्र नवरात्रीत देखील घट बसवण्याची प्रथा आहे. हे घट मातीचे असून त्याला सृष्टीचे रुप मानले जाते.
...म्हणून साजरी केली जाते चैत्र नवरात्र!
चैत्र नवरात्र हे वसंत ऋतूत असतं. वसंत ऋतूंत वृक्षांना नवी पालवी येत असते. नवी फुलं बहरत असतात. सारी सृष्टी चैतन्यमय झालेली असते. वसंत ऋतूत साऱ्या सृष्टीमध्ये नवनिर्मितीचे दर्शन होते. निर्मितीच्या याच शक्तीचे पूजन चैत्र नवरात्रीत केले जाते. चैत्र नवरात्र दरम्यान आंबेडाळ आणि कैरीचं पन्ह घरच्या घरी कसं बनवाल (Watch Video)
दोन्ही नवरात्र या नऊ दिवसांच्याच असतात. निर्मिती शक्ती आणि नऊ अंक यांचे अतूट नाते आहे. कारण 'बी' जमिनीत पेरल्यापासून नऊ दिवसानी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने, नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. म्हणून नऊ या अंकाला महत्त्व असून या अंकाला ब्रह्मसंख्या असे म्हणतात. म्हणूनच निर्मिती शक्तीची ही पूजा नऊ दिवस सुरु असते.
नऊ दिवस देवींच्या नऊ रुपांची पूजा
नऊ दिवसांच्या या नवरात्रीत देवीच्या विविध रुपांची पूजा प्रार्थना केली जाते. अनेक श्रद्धाळू भक्त 9 दिवस उपवास करतात. चैत्र नवरात्रीत प्रतिपदेला शैलपुत्री, द्वितीयेला ब्रह्मचारिणी , तृतीयेला चंद्रघंटा , चतुर्थीला कुष्मांडा, पंचमीला स्कंदमाता, षष्ठीला कात्यायिनी, सप्तमीला कालरात्री, अष्टमीला महागौरी व नवमीला सिद्धिदात्री या देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
चैत्र नवरात्र साजरा करण्यामागील उद्देश
सृष्टीतील निर्मिती शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हा चैत्र नवरात्र साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. सर्वसामान्यांसाठी या निर्मिती शक्तीला देवीचे रुप देण्यात आले आहे. या देवीची पूजा करणे म्हणजे त्या शक्तीविषयी कृतज्ञता, सन्मान व्यक्त करणे होय. तसंच आपले सर्व सण आणि व्रते ही निसर्गावर आधारित आहेत. त्यामुळे या विविध सणांच्या निमित्ताने निसर्गाचे भान ठेवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे हा त्यामागील उद्देश, हेतू आहे.