April Fool 2021: 'एप्रिल फूल'निमित्त मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांची चेष्टा करण्यासाठी काही भन्नाट आयडिया
एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्वसाधारणपणे आपले जवळचे लोक, मित्र, कुटुंबातील व्यक्ती यांची चेष्टा केली जाते, त्यांच्याशी खोटे बोलून त्यांना शेंडी लावली जाते
मार्चनंतर आता एप्रिल महिना उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे, याचाच अर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकांना ‘एप्रिल फूल’ (April Fool 2021) म्हणजेच मूर्ख बनवण्याचा दिवस. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्वसाधारणपणे आपले जवळचे लोक, मित्र, कुटुंबातील व्यक्ती यांची चेष्टा केली जाते, त्यांच्याशी खोटे बोलून त्यांना शेंडी लावली जाते, या ना त्या प्रकारे त्यांच्या खोड्या काढल्या जातात. हे सर्व करण्यामागे मनात कोणतीही वाईट भावना नसते, तर निखळ मनोरंजन हा यामागील उद्देश असतो. नक्कीच तुमच्याही डोक्यात 1 एप्रिलला आपल्या जवळच्या लोकांची चेष्टा करण्याचा विचार आला असेल. त्याला थोडे खतपाणी घालण्याचे काम आम्ही या लेखाद्वारे करत आहोत. या लेखामध्ये आम्ही काही सोप्या आयडीयाज, प्रँक करण्यासाठी कल्पना यांची यादी देत आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही लोकांना ‘उल्लू’ बनवू शकता.
- ओरिओ बिस्किटांचा एक पॅक विकत घ्या आणि या बिस्किटांमधील क्रीम काढून त्याऐवजी टूथपेस्ट लावा, जेव्हा कोणी हे बिस्किटे खील तेव्हा त्याची चांगलीच फजिती होईल.
- आपल्या मित्राच्या कीबोर्डवरील M आणि N बटणे स्विच करा. त्यानंतर मजा घ्या, जेव्हा तुमचा मित्र M टाईप करेल तेव्हा N अक्षर उलटेल आणि N दाबल्यावर M.
- एखाद्या मित्राला टार्गेट करून त्याला आपल्या ग्रुपमधील सर्वांना साधारण 30 मिनिटांच्या अंतराने कॉल करून XYZ व्यक्ती बोलत आहे का? असे विचारायला सांगा. असे सारखे कॉल आल्याने तो खूप चिडेल.
- आपल्या एखाद्या मित्राच्या फेसबुकच्या सेटिंगमध्ये जाऊन त्यांची बर्थडेट 1 एप्रिल अशी करा. ज्यामुळे वाढदिवस नसताना लोक त्यांना शुभेच्छा देतील.
- आपल्या गर्लफ्रेंडच्या साबणावर जाडसर पारदर्शक नेटपेंटचा थर चढवा. जेव्हा ती अंघोळीला जाईल तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी साबण अंगाला लागणार नाही.
- स्वयंपाकघरातील ड्रॉवरमधील गोष्टी, कपाटामधील सर्व गोष्टी बदलून आई किंवा बायकोचा गोंधळ उडवून द्या.
- आपल्या नवऱ्याच्या फोनवर भाषा सेटिंग बदलून अशी भाषा निवडा ज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसेल, उदा- फ्रेंच किंवा स्पॅनिश
- सकाळी उठल्याबरोबर एखादी फेक बातमी बनवून सर्वांना घाबरवा किंवा आश्चर्यचकित करा. परिस्थितीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडा मसाला घालून ती गोष्ट वाढवू शकता.
मात्र लक्षात घ्या या दिवस फक्त मनोरंजन म्हणून साजरा करायचा आहे. यामागे कोणालाही मानसिक व शारीरिकदृष्ट्या दुखावण्याचा हेतू नसावा. (हेही वाचा: April Fool Day 2021: एप्रिल फूल म्हणजे काय? हा दिवस साजरा करण्यास कधीपासून झाली सुरुवात? जाणून घ्या)
दरम्यान, एप्रिल फूल साजरा करण्याची प्रथा नक्की कधी सुरु झाली याबाबत काही ठोस पुरावे नाहीत. मात्र यामागची एक कथा सांगितली जाते ती म्हणजे, ‘पॉप ग्रेगरी 13 यांनी 1582 मध्ये ज्यूलियन कॅलेंडरऐवजी ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे 1 जानेवारीपासून सुरु होत होते, मात्र त्याआधीपर्यंत नवे वर्ष 1 एप्रिलला साजरे केले जाई. मात्र फ्रांसमधील अनेकांनी हे नवे कॅलेंडर मानण्यास नकार दिला, ज्यांना पुढे ‘एप्रिल फूल’ असे संबोधले जाऊ लागले. पुढे हीच गोष्ट संपूर्ण युरोप व जगभरात पसरली.