Anganewadi Jatra 2020: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेला आजपासून मोठ्या जल्लोषात सुरूवात

दरम्यान या जत्रेमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावण्यास सुरूवात केली आहे.

Bharadi Devi Jatra File Images | Photo Credits: Instagram

Bharadi Devi Jatra 2020:  कोकणातील नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आंगणेवाडीच्या (Anganewadi Jatra) भराडीदेवीच्या (Bharadi Devi) यंदाच्या जत्रेला (17 फेब्रुवारी) आजपासून सुरूवात झाली आहे. या जत्रेला मुंबई, पुण्यासह देशा-परदेशातून भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. दीड दिवस चालणार्‍या देवीच्या या जत्रेमध्ये मालवणवासियांचा मोठा उत्साह पहायला मिळतो. आज जत्रेच्या निमित्ताने भराडी देवीच्या मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट केलेली आहे. दरम्यान आज जत्रेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्यासोबतीला महाविकास आघाडीमधील मंत्री आणि अन्य नेते मंडळी देखील हजेरी लावणार आहेत. (Anganewadi Jatra 2020: भराडी देवीचा गोंधळ ते ताट लावण्याची प्रथा आंगणेवाडी जत्रेमध्ये असते या 8 गोष्टींचं आकर्षण!).

कसा असेल आजच्या मंदिरामधील दिवसभराचा कार्यक्रम

आज पहाटे 3 वाजल्यापासूनच भाविकांसाठी भराडी देवीच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान रात्री 9 ते 1 या चार तासांत आंगणे कुटुंबियांचे मंदिरात धार्मिक विधींचा कार्यक्रम पार पाडतील. मध्यरात्री एकनंतर दर्शन, ओटी भरणे आदी कार्यक्रम सुरू होतील. या जत्रेदरम्यान सुमारे 8-10 लाख भाविक दीड दिवसांत देवीच्या दर्शनासाठी कोकणामध्ये पोहचतात.

असा असतो मंदिर परिसरातील उत्साह  

 

View this post on Instagram

 

श्री भराडी देवी यात्रा, आंगणेवाडी..... १७ फेब्रुवारी २०२० श्री भराडीदेवीचं मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मालवणपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवस चालते. कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला जाणार्या चाकरमान्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीच्या लाल डब्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोकण रेल्वेबरोबरच खाजगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावाची एक वाडी. म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी, मात्र गेल्या पाच-पंचवीस वर्षांत तिला स्वरूप आलं आहे ते महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रासारखं. #bharadidevi #konkan #konkanmaharashtra . Follow @konkanmaharashtra . Video credit - @made_in_kokan_

A post shared by konkan - कोकण (@konkanmaharashtra) on

श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच सुरुवात होते. तर भाविकांना कमी वेळात दर्शन घेता यावे म्हणून आंगणे कुटुंबियांकडून विशेष सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मालवण आणि कणकवली स्थानकाहून येणाऱ्या दिव्यांगांना थेट मंदिरापर्यंत पोहचवण्यासाठी रिक्षाची सोय करुन देण्यात आली आहे. तर मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून रेल्वे मार्गावर आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेनिमित्त विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत.