Atal Bihari Vajpayee 1st Death Anniversary: ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी; पीएम नरेंद्र मोदी 'सदैव अटल' स्मारक येथे वाहतील श्रद्धांजली

16 ऑगस्ट 2018 रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते वाजपेयी यांचे निधन झाले होते. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पक्षाचे देशातील कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली वाहतील

Former Prime Minister Atal Bihari Vajpayee | (Photo Credits: PTI)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) संस्थापक सदस्य, ज्येष्ठ नेते, भारतरत्न आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज पहिली पुण्यतिथी (Death Anniversary). 16 ऑगस्ट 2018 रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते वाजपेयी यांचे निधन झाले होते. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पक्षाचे देशातील कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली वाहतील. अटलबिहारी वाजपेयी यांची मूर्ती प्रत्येकाच्या मनात तशीच राहावी म्हणून पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे. अटलबिहारी वाजपेयी 1991 ते 2009 या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी शुक्रवारी म्हणजे आज दिवंगत भाजपचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजधानी दिल्ली येथे श्रद्धांजली वाहतील. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अनेक बडे नेते माजी पंतप्रधान 'सदैव अटल' यांच्या स्मारकाला भेट देतील. (हेही वाचा: नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयींच्या स्मरणार्थ विशेष नाण्याचं लोकार्पण

धुरंधर आणि मुत्सद्दी राजकारणी, संवेदशनशील कवी, ओजस्वी वक्ते, पत्रकार, लेखक अशा अनेक छटा लाभलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व मागच्यावर्षी आपल्यातून हरपले. वयाच्या 93 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने त्यांनी आपल्यातून निरोप घेतला होता. अटलबिहारी वाजपेयी यांनी 1996 साली 13 दिवस, 1998 साली 13 महिने आणि 1999 सालापासून पुढे पूर्ण पाच वर्ष पंतप्रधानपद भूषविले. 2015 साली त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सध्या केंद्रात दुसऱ्यांदा भाजपने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे, हे पाहून अटलबिहारी वाजपेयी यांना नक्कीच अभिमान वाटला असता.