विद्यार्थी दिवस 2019: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो विद्यार्थी दिवस; जाणून घ्या या दिवसाचे महत्व
बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ म्हणून साजरा केला जातो. 27 ऑक्टोबर 2017 साली राज्यभर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जावा असा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला.
आज 7 नोव्हेंबर. आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस (Student Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुख्यत्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ म्हणून साजरा केला जातो. 27 ऑक्टोबर 2017 साली राज्यभर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जावा असा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची शैक्षणिक वाटचाल खूपच रोमहर्षक आहे. हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता यांसारख्या अनेक पैलूंमधून आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन करतो. आंबेडकरांना स्वत: देखील आजन्म विद्यार्थी मानले. म्हणूनच शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले.
मात्र आपल्यापैकी ब-याच जणांना ही गोष्ट माहित नसेल की शासनाने हाच दिवस विद्यार्थी दिवस म्हणून का निवडला? तर त्याला ही तसे विशेष कारण आहे. 7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. 1904 पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. त्यानंतर 2003 पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आले आहेत. त्यांनी या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करावा अशी शासनाकडे अनेकदा मागणी केली. त्यानंतर शेवटी 2017 साली महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2019: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे म्हणून तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी, यासाठी शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.