या 5 उपायांनी थांबवा अन्नाची होणारी नासाडी

अन्नाची नासाडी थांबवण्यासाठीचे काही सोपे उपाय

(Photo Credit: Facebook)

अन्नाचा एक घासही किती महत्वाचा आहे हे फक्त एक उपाशी किंवा भुकेलेली व्यक्तीच सांगू शकेल. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे आजही इतर लोकांनी फेकून दिलेल्या अथवा उष्ट्या अन्नावर जगतात. आजही दरोरज शिळे अन्न मागण्यासाठी अनेक भिकारी दारोदारी फिरताना दिसतात. याउलट आपल्याकडे लग्न किंवा इतर समारंभामध्ये अन्नाची फारच नासाडी होते. साहजिक अन्नाची नासाडी म्हणजे पैश्यांची नासाडी. एका सर्वेनुसार आपण महिन्याला जितके अन्न विकत घेतो त्याच्या 30% अन्नाची प्रत्येक महिन्याला आपल्याकडून नासाडी होत असते.

त्यामुळे आपल्याला वेळीच पैशांची आणि अन्नाची किंमत आणि त्याचे महत्व समजले पाहिजे. जेणेकरून आपल्याकडून होणाऱ्या अन्नाची नासाडी होणार नाही. चला तर अशा प्रकारे अन्नाची नासाडी थांबवण्यासाठीचे काही सोपे उपाय

< आधीच व्यवस्थित प्लॅन करून करा स्मार्ट शॉपिंग – खाण्या-पिण्याच्या गोष्टी विकत घेण्याआधी पहिल्यांदा आवश्यक असणाऱ्या गोष्टींची यादी करा. खरेदी करताना आपल्याकडे आधी कोणते साहित्य आहे आणि कोणते नाही याचा विचार करुन अशाच गोष्टींना प्राधान्य द्या ज्या आपल्याला खरच उपयोगी आहेत. आठवड्याचा जेवणाचा मेन्यू जर का आधीच ठरवला तर त्यानुसार खरेदी करणे सोपे जाते. ज्यामुळे तुमच्या पैशांचीही बचत होते.

< फ्रिजमध्ये पदार्थ/वस्तू साठवून ठेऊ नका – खूप वेळा शिल्लक राहिलेले जेवण, अथवा इतर शिल्लक राहिलेले खाण्याचे पदार्थ आपण फ्रिजमध्ये साठवून ठेवतो. मात्र प्रत्येकवेळी नवीन वस्तू येत राहतात आणि या आधीच्या फ्रिजमधील वस्तूंकडे आपले दुर्लक्ष होते. काही दिवसांनंतर या फ्रिजमधील वस्तू खराब होतात, अशावेळी त्या फेकून देण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे अन्नाचे होणारी नासाडी रोखण्यासाठी दर 3-4 दिवसांमध्ये फ्रिजची साफसफाई करत जा. ज्यामुळे फ्रिजमध्ये कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या विकत घ्याव्या लागतील याची कल्पना येते.

< जेवढी भूक आहे तेव्हढेच अन्न वाढून घ्या – खूप वेळा जितकी आपल्याला भूक आहे त्यापेक्षा जास्त अन्न आपण ताटात घेतो आणि शिल्लक राहिलेले अन्न फेकून दिले जाते. त्यामुळे आपल्याला जितकी भूक आहे त्यानुसारच अन्न वाढून घेणे फार गरजेचे आहे. शक्यतो लहान मुलांना जेवण भरवताना फार अन्न वाया जाते. अशावेळी त्यांना जितके हवे तितकेच अन्न वाढत जा.

< जेवढी गरज आहे तितकेच अन्न बनवा – जेवण बनवण्यापूर्वी शक्यतो जेवणाचा मेन्यू बनवणे फायद्याचे ठरते. तसेच जेवणासाठी अंदाजे किती लोक आहेत याचाही विचार जेवण बनवताना करणे गरजेचे आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण काय बनवणार आहोत याची आधीच कल्पना असल्याने तितक्या प्रमाणातच जेवण बनवले जाते. ज्यामुळे जास्तीचे बनवलेले अन्न फेकून देण्याचा प्रश्नच उद्भवत नही.

< अन्न पदार्थांची योग्य प्रकारे साठवणूक करा – आपल्या जेवणात अशा अनेक गोष्टी अथवा पदार्थ असतात जे योग्य प्रकारे साठवून ठेवल्याने जास्त दिवस टिकतात. केचअप, लोणी किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ योग्य प्रकारे साठवल्याने वरचेवर विकत घ्यायची गरज पडत नाही. तसेच आले, कोथिंबीर, कढीपत्ता, विविध चटण्या अशा अनेक गोष्टी तुम्ही फार दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेऊ शकता. फक्त त्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे.

तर अशाप्रकारचे उपाय तुम्हीही केलेत तर नक्कीच तुमच्याकडून होणाऱ्या अन्नाच्या नासाडीचे प्रमाण फारच कमी होईल.