उत्तर प्रदेश येथे निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; सीएम योगी आदित्यनाथ 3 दिवस, तर मायावती 2 दिवसांसाठी बॅन
सोबत मायावती (Mayawati) यांच्यावरही 48 तासांसाठी प्रचाराला बंदी घातली आहे.
सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात अगदी छोट्या गोष्टींवरही निवडणूक आयोगाचे लक्ष आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी अली-बजरंगबली संदर्भात एक विवादित वक्त्यव्य केले होते. याबाबत निवडणूक आयोगा (Election Commision)ने कारवाई करत त्यांना 72 तास प्रचाराला बंदी घातली आहे. सोबत मायावती (Mayawati) यांच्यावरही 48 तासांसाठी प्रचाराला बंदी घातली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.
उद्यापासून योगी आदित्यनाथ पुढचे तीन दिवस तर मायवती दोन दिवस आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करु शकणार नाहीत. 16 एप्रिल सकाळी सहा वाजल्यापासून ही प्रचारबंदी अंमलात येणार आहे. 7 एप्रिल रोजी सहारनपूर देवबंद येथे मायावतींची सभा होती. यावेळी मायावती यांच्या भाषणाचा जे मुद्दे होते, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो असे निवडणूक आयोगाचे मत आहे. तसेच मायावती यांनी मुस्लीम मतदारांना मत देण्याचे आवाहन केले होते. (हेही वाचा: निवडणूक आयोगाला जेलमध्ये पाठवण्याचा इशारा; प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल)
10 एप्रिल रोजी योगी आदित्यनाथ यांची मेरठ येथे सभा आयोजित केली होती. या सभेत ते, ‘काँग्रेस, सपा, बसपाचा ‘अली’वर विश्वास असेल तर भाजपाचा ‘बजरंग बली’वर विश्वास आहे’ असे म्हणाले होते. दरम्यान, राफेल करारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चौर हैं’ असे वक्तव्य अनेकदा केले होते. त्यामुळे राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे, 22 एप्रिल पर्यंत याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.