West Bengal Suicide News: अल्पवयीन विद्यार्थ्याची शाळेच्या इमारतीवरून उडी घालून आत्महत्या; वडिलांनी शाळा प्रशासनाला दिला दोष
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
West Bengal Suicide News: कोलकाता मध्ये आणखी एका धक्कादायक घटना घडली. कोलकाता येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने सोमवारी दुपारी शाळेच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मृत विद्यार्थ्याचे पालक मात्र आपल्या मुलाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल शाळा प्रशासनाला जबाबदार धरत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या वडिलांनी मुलाचा शाळेतू छळ करण्यात आल्याचा आरोप केला आहे. माध्यमांशी बोलताना मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाचा छळ करण्यात आला कारण त्याने एक गट तयार केला होता आणि कोविड परिस्थितीत फी वाढवण्याच्या शाळेच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयाला विरोध केला होता.
मुलगा प्रकल्प अहवाल सादर करण्यात अयशस्वी ठरल्याने इतर विद्यार्थ्यासमोर त्याचा अपमान करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या प्रशासनाकडून त्याचा मानसिक छळ करण्यात आला. शाळेच्या प्रशासनाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. कारण महामारीच्या काळात फी वाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या पालकांपैकी मी एक होतो. असे मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सुरुवातीला त्यांचा मुलगा पायऱ्यांवरून खाली पडल्याची माहिती त्यांना मिळाली होती, परंतु शाळेत पोहोचल्यावर त्यांच्या मुलाने शाळेच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस या घटनेचा तपास करत आहे. शाळा प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.