PM Modi on Union Budget 2024: 'आपल्याला प्रत्येक गावात, घरामध्ये उद्योजक घडवायचे आहेत'; केंद्रीय अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
त्यांनी सांगितले की, यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. या अर्थसंकल्पात सरकारने 'एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह' योजना जाहीर केली आहे.
PM Modi on Union Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे (Union Budget 2024) कौतुक केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत 2024 चा अर्थसंकल्प सादर केला आणि अनेक घोषणा केल्या. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'आपल्याला प्रत्येक गावात, घरामध्ये उद्योजक घडवायचे आहेत. देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेणाऱ्या अर्थसंकल्पाबद्दल मी नागरिकांचे अभिनंदन करतो. हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला बळ देणारा अर्थसंकल्प आहे. नव्या मध्यमवर्गाच्या सक्षमीकरणाच्या सातत्यपूर्ण वाटचालीचा हा अर्थसंकल्प आहे. 10 वर्षात 25 कोटी जनता गरीबीतून वर आली आहे. हे दलित आणि मागासवर्गीयांना सशक्त बनविण्याच्या योजनांमुळे शक्य झाले. हा अर्थसंकल्प रोजगार आणि स्वयंरोजगाराला बळकटी देतो.'
यावेळी पंतप्रधानांनी सरकारने जाहीर केलेल्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. या अर्थसंकल्पात सरकारने 'एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह' योजना जाहीर केली आहे. यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्यास मदत होईल. या योजनेंतर्गत, नव्याने काम करणाऱ्यांना सरकार पहिला पगार देणार आहे. खेड्यापाड्यातील तरुणांना हे काम करता येईल. आम्हाला प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात उद्योजक घडवायचे आहेत, असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा -Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद; शेतकऱ्यांसाठी काय आहे खास? वाचा)
हा अर्थसंकल्प शिक्षण आणि कौशल्याला एक नवीन परिमाण देईल. मध्यमवर्गाला नवे बळ देईल. आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांना बळकट करण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्प मजबूत योजना घेऊन आला आहे. या अर्थसंकल्पामुळे आर्थिक भागीदारी निश्चित करण्यात मदत होईल, असेही पंतप्रधान म्हणाले. (हेही वाचा - Angel Tax Abolished: गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! एंजल टॅक्स रद्द; स्टार्टअप्सना मिळणार चालना)
पहा व्हिडिओ -
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकाच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रासाठी भरीव तरतूदीच्या घोषणा केला. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे लोन देण्यात येणार आहे.