Madhya Pradesh: कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोनाबाधित महिलेवर वार्ड बॉयकडून बलात्काराचा प्रयत्न; आरोपीला अटक
तसेच वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली आहे.
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका वॉर्ड बॉयने ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी वॉर्ड बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. वास्तविक ही घटना ग्वाल्हेरमधील खासगी रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधील आहे. या महिलेची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे तिला ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या मुलाने एफआयआरमध्ये लिहिलं आहे की, शनिवारी रात्री विवेक लोधी नावाचा एक वॉर्ड बॉय त्याच्या आईच्या वॉर्डात आला. त्याची आई कोरोना संक्रमित आहे, म्हणून कोणीही त्या खोलीत उपस्थित नव्हतं. याचा फायदा घेत वार्ड बॉयने तक्रारदार मुलाच्या आईसोबत गैरवर्तन करण्यास सुरवात केली. (वाचा - Student Suicide: गुरुग्राम मध्ये 15 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या; मुख्याध्यापक रागावल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल)
त्यानंतर महिलेने वॉर्ड बॉयवर ओरडण्यास सुरवात केली. तेव्हा घाईघाईने तो खोलीतून फरार झाला. यानंतर महिलेने आपल्या मुलाला बोलावून संपूर्ण घटनेची माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच महिलेचा मुलगा आपल्या कुटुंबातील सदस्यांसह रुग्णालयात पोहोचला.
मुलाच्या फिर्यादीवरून आरोपी विवेक लोधीविरूद्ध कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली आहे. याशिवाय नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा आणखी तपास सुरू आहे. तसेच, संपूर्ण प्रकरणात वॉर्ड बॉयची चौकशी केली जात आहे.