Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये अंतिम टप्प्यात 78 जागांसाठी आज मतदान; नितीश सरकारच्या मंत्र्यांसह RJD आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे भवितव्य ठरणार

बिहारमध्ये दोन टप्प्यांतील मतदान यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आज विधानसभेच्या 78 जागांसाठी तिसऱ्या म्हणजेचं अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

Bihar Assembly Election 2020 (PC - ANI)

Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये दोन टप्प्यांतील मतदान यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आज विधानसभेच्या 78 जागांसाठी तिसऱ्या म्हणजेचं अंतिम टप्प्यातील मतदान (Bihar Election Third Phase) पार पडणार आहे. बिहार निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात विधानसभा अध्यक्ष विजय कुमार चौधरी व्यतिरिक्त नितीश कुमार यांच्या 12 मंत्र्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. त्याचबरोबर महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 15 जिल्ह्यातील 78 विधानसभा मतदार संघात 2.35 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 33,782 मतदान केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून म्हटलं आहे की, 'बिहार विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा आज तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे. लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि मतदानाचं नवीन रेकोर्ड बनवा. याशिवाय मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.' (हेही वाचा - Tajinder Bagga Posters : अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपच्या तेजींदर बग्गा यांच्याकडून 'महाराष्ट्र सदन' इमारतीसमोर पोस्टरबाजी, 'आणीबाणी 0.2' असा उल्लेख)

याशिवाय आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे की, लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपले मतदान नोंदवावे. या निवडणुकीत तुमचं भविष्य ठरेल. नितीश जी आता थकले आहेत आणि ते राज्य सांभाळण्यास असमर्थ आहेत. तसेच LJP प्रमुख चिराग पासवान यांनी म्हटलं आहे की, 'ज्या पद्धतीने लोक 'बिहार प्रथम, बिहारी प्रथम' शी जोडले जात आहेत, मला विश्वास आहे की, या टप्प्यातदेखील आमची कामगिरी चांगली होईल. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, नितीशकुमार जी कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत.'

अंतिम टप्प्यात विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार चौधरी यांच्या व्यतिरिक्त नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील 12 सदस्यांसह आरजेडीच्या अनेक नेत्यांचे भवितव्य निश्चित करण्यात येणार आहे. तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीत पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, मधेपुरा, सहरसा, दरभंगा, मुजफ्फरपूर, वैशाली आणि समस्तीपूर जिल्ह्यांच्या विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. बिहार निवडणुकीच्या तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात बिहारचे विधानसभा अध्यक्ष विजय कुमार चौधरी, विजेंदर प्रसाद यादव, नरेंद्र नारायण यादव, महेश्वर हजारी, रामदेव ऋषिदेव, फिरोज अहमद, लक्ष्मेश्वर राय, बीमा भारती, मदन सहनी, सुरेश शर्मा, प्रमोद कुमार, बिनोद नारायण झा आणि कृष्णा कुमार ऋषि हे निवडणूक रिंगणात आहेत.