Citizenship Amendment Act 2019: सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चिंताजनक ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर आपल्या ट्विट हँडलवरून भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देशात नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याचं म्हटलंय.
संसदेत मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे (Citizenship Amendment Act 2019) देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीमधील (Jamia Millia Islamia University) जामिया मिलीया विद्यापीठातील (AMU) विद्यार्थ्यांच्या निदर्शनाला हिंसक वळण लागलं आहे. तसेच या कायद्याला विरोध करण्यासाठी देशातील विद्यार्थी आंदोलने करत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर आपल्या ट्विटर हँडलवरून भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देशात नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याचं म्हटलंय. (हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीत आंदोलकांचा हिंसाचार; बसेस आणि दुचाकी जाळल्या)
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात सुरू असलेली हिंसक निदर्शने अतिशय दुर्दैवी आणि त्रासदायक आहेत. मतभेद, वादविवाद आणि चर्चा हे लोकशाहीचे भाग आहेत. मात्र, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि दैनंदिन जीवनात बाधा निर्माण करणे, हे आपल्या नैतिकतेला अनुसरून नाही, असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. (हेही वाचा - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी Citizenship Amendment Act आणि NRC च्या विरोधात काढला निषेध मोर्चा)
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाच्या धर्माला बाधा येणार नाही. त्यामुळे कोणत्याही भारतीयाने या कायद्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. हा कायदा अनेक वर्षांपासून छळ सहन करणाऱ्यासाठी आहे. या लोकांकडे भारताशिवाय दुसरा पर्याय नाही.
भारताच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे. देशात शांतता, एकता आणि बंधुता राखण्याची हीच वेळ आहे. तसेच सर्वांनी खोट्या अफवांपासून दूर राहिलं पाहिजे, असं आवाहनही नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटद्वारे केलं आहे.