उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे ट्रक-बसच्या धडकेत 20 जणांचा मृत्यू, तर 21 जण जखमी
या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशमधील कन्नौज (Kannauj) येथे प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात टक्कर होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री अपघातग्रस्त बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. परंतु, वाटेत झालेल्या भीषण अपघातामुळे बसला आग लागली. या आगीचे तीव्रता इतकी होती की प्रवाशांना बसमधून बाहेरही पडता आले नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना या अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून जखमींना 50 हजार रूपये तर मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. (हेही वाचा - देशात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्येत वाढ: राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून 2018 मधील आकडेवारी जाहीर; पहा धक्कादायक वास्तव)
शुक्रवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. बसला आग लागल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पूर्णपणे जळून गेले आहेत. परिणामी त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दु:ख व्यक्त केलं आहे.