आंदोलकांसमोर डाळ न शिजल्याने; मंदिरात प्रवेश न करताच तृप्ती देसाई पुण्याला परतणार
आंदोलकांसमोर आपली डाळ न शिजल्याने तृप्ती देसाई रात्री पुण्यात परतणार आहेत
केरळच्या प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली, आणि त्याचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटायला सुरुवात झाली. केरळमध्ये अजूनही या निर्णयाविरोधात आंदोलन चालू आहे. या आंदोलनात महिलांचादेखील लक्षवेधी समावेश आहे. या प्रकरणात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनीदेखील आपला आवाज उठवायला सुरुवात केली होती. मंदिरात प्रवेश करणारच अशी भूमिका घेऊन तृप्ती देसाई आज पहाटे केरळ येथे दाखल झाल्या होत्या. मात्र आंदोलकांनी त्यांना विमानतळावरच रोखून ठेवले आणि त्यांचे विमानतळाबाहेर पडण्याचे मार्ग बंद केले गेले. आता या आंदोलकांसमोर आपली डाळ न शिजल्याने तृप्ती देसाई रात्री पुण्यात परतणार आहेत. एएनआयने या संदर्भात वृत्त दिले आहे.
शबरीमाला मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही असा इशारा देऊन तृप्ती देसाई केरळला गेल्या. मंदिरात प्रवेश करणारच अशी आक्रमक भूमिका त्यानी घेतली मात्र याचा काही एक उपयोग झाला नाही. ‘तृप्ती देसाईंनी परत फिरावं अन्यथा त्यांना आमच्या छातीवर पाय देऊन मंदिरात जावं लागेल’, असा इशाराच विमानतळाबाहेर ठाण मांडून बसलेल्या राहुल इश्वर यांनी दिला. तृप्ती देसाई यांच्याविरोधातील या आंदोलनात अनेक महिलादेखील सामील झाल्या होत्या. त्यामुळे आता दिवसभर विमानतळावरच अडकलेल्या तृप्ती देसाई परत पुण्याला येणार आहेत.
तृप्ती देसाई यांनी याआधी कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, शनिशिंगणापूर, हाजीअली दर्गा इथे प्रवेशासंदर्भात आंदोलन केले होते. 17 नोव्हेंबरला त्या शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार होत्या.