देशावरील कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी राम मंदिर भूमिपूजनापर्यंत दररोज 5 वेळा हनुमान चालिसाचं पठण करा; प्रज्ञासिंह ठाकूर यांचे जनतेला आवाहन

त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. देशातून कोरोनाचं उच्चाटन करण्यासाठी हा एक अध्यात्मिक पर्याय असल्याचंदेखील प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Sadhvi Pragya Singh Thakur (Photo Credits- IANS)

देशावरील कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी राम मंदिर भूमिपूजनापर्यंत दररोज 5 वेळा हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa) पठण करा, असं आवाहन भाजप नेत्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी जनतेला केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. देशातून कोरोनाचं उच्चाटन करण्यासाठी हा एक अध्यात्मिक पर्याय असल्याचंदेखील प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, देशात कोरोनाला संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक अध्यात्मिक प्रयत्न करुयात. येत्या 5 ऑगस्टपर्यंत आपल्या घरी दररोज संध्याकाळी सात वाजता 5 वेळा हनुमान चालीसा म्हणा. या कार्यक्रमाचा समारोप 5 ऑगस्ट रोजी घरात दिवा लावून रामलल्लाच्या आरतीने करा. (हेही वाचा - Rajasthan Plotical Crisis: मुख्यमंत्री अशोक गहलोथ यांच्याकडून राज्यपालांना नवे पत्र; अधिवेशन बोलावण्याची मागणी, बहुमत सिद्ध करण्याबाबत उल्लेख नाही)

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना प्रज्ञासिंह यांचा हा दावा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटीझन्सनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीदेखील प्रज्ञासिंह यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत.

दरम्यान, मागील आठवड्यात केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी हातात पापडाचं पॅकेट पकडलं होतं. हे पॅकेट ‘भाभीजी पापड’ कंपनीचं आहे. हे पापड खाल्यावर कोरोना होत नाही किंवा बाधित रुग्ण कोरोनामुक्त होतो, असा दावा मेघवाल यांनी केला होता.