मुंबई, दिल्ली, गोवा येथे मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले (Terrorist Attack) घडवण्याची आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशांतील संबंध कमालीचे ताणले आहेत. सध्या भारतामध्ये लोकसभा निवडणुकीची धूम असताना, दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले (Terrorist Attack) घडवण्याची आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबई, गोवा शहरांमध्ये हाय अटर्ल जारी केला आहे. न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला घडवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. येत्या चार दिवसांत हल्ला होऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
दिल्ली, मुंबई आणि गोवा येथील ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले करण्याच्या तयारीत या दोन संघटना आहेत. या हल्ल्यांसाठी दहशतवादी एखाद्या वाहनाचा किंवा चाकूचा वापर करण्याची शक्यता आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच इस्रायली दूतावास, मुंबईतील दूतावास तसेच ज्यू लोकांची धर्मस्थळे, सिनेगॉग्स आणि छाबड हाऊस अशा ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिल्या आहेत. (हेही वाचा: क्राइस्टचर्च येथील 2 मस्जिदमधील गोळीबारात बांग्लादेश क्रिकेट संघ सुदैवाने बचावला)
20 मार्च ला या हल्ल्याबाबत प्रथम माहिती मिळाली, ज्यामध्ये न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला घेण्याचा उल्लेख होता. त्यानंतर 23 मार्चला गुप्तचर यंत्रणांना याबाबत ठोस माहिती मिळाली. त्यानुसार या तीनही शहरांतील विविध ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.