जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 दिवसांत तिरंगा फडकणार; उपराज्यपालांनी दिले विशेष आदेश

यापूर्वी जम्मू-काश्मीर राज्याच्या घटनेच्या कलम 144 अन्वये स्वतंत्र लाल रंगाचा ध्वज स्वीकारण्यात आला होता.

राष्ट्रध्वज (PC - pixabay)

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) उपराज्यपालांनी (Lieutenant Governor) येथील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये तिरंगा (National Flag) फडकविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालय जम्मू यांनी सर्व उपायुक्त आणि विभाग प्रमुखांना पुढच्या पंधरा दिवसांत सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावण्यासंदर्भात उपराज्यपालांच्या सूचना लागू करण्यास सांगितले आहे. जम्मूचे विभागीय आयुक्त यांना मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या भारतीय ध्वज संहितेच्या तरतुदीनुसार जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सुनिश्चित करण्यासाठी जम्मू विभागातील विविध विभागांच्या उपायुक्त आणि विभागीय प्रमुखांना सांगितले गेले आहे.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी नुकतीच विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, एसपी यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जम्मू-काश्मीरमधील सर्व 20 जिल्ह्यांतील डीसी, एसपींना सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावण्याचे आदेश दिले. (वाचा - Holi Festival Guidelines: दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह 'या' राज्यात होळी साजरी करण्यास प्रतिबंध; जाणून घ्या तुमच्या राज्यातले निर्बंध)

'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत उपक्रमांचा आढावा घेताना उपराज्यपाल यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना त्यांच्या भागातील स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या लोकांची ओळख करून घेण्यास सांगितले. या व्यक्तींचा समारंभात सन्मान करण्यात येणार असल्याचंही उपराज्यपालांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, कलम 370 रद्द केल्यावर आता जम्मू-काश्मीरमध्ये केवळ भारताचा तिरंगा ध्वज फडकविला जातो. यापूर्वी जम्मू-काश्मीर राज्याच्या घटनेच्या कलम 144 अन्वये स्वतंत्र लाल रंगाचा ध्वज स्वीकारण्यात आला होता. 7 जुलै 1952 रोजी जम्मू-काश्मीरच्या संविधान समितीने एक अध्यादेश काढला आणि 11 जुलै 1939 राज्याचा अधिकृत ध्वज स्वीकारला होता.