धक्कादायक! ठाकोर समाजात अविवाहित मुलींनी मोबाईल वापरल्यास दीड लाखाचा दंड; जात पंचायतीचा निर्णय
ठाकोर समाजातील अविवाहित मुलींनी मोबाईल वापरायचा नाही, असे फर्मान समाजाच्या पंचायतीने काढले आहे. जर का अविवाहित मुली मोबाईल वापरताना दिसल्या तर त्यांच्या वडिलांना दीड लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
एकीकडे भारत चांद्रयान-2 ची तयारी करत आहेत, दुसरीकडे अजूनही समाजावर जात पंचायत आणि खाप पंचायत यांचा पगडा असलेला दिसत आहे. यामुळेच मुलींवर असलेली बंधने अजून वाढत आहेत. गुजरातच्या ठाकोर समाजाने (Thakor Community) मुलींबाबत एक कठोर निर्णय घेतला आहे. ठाकोर समाजातील अविवाहित मुलींनी मोबाईल वापरायचा नाही, असे फर्मान समाजाच्या पंचायतीने काढले आहे. जर का अविवाहित मुली मोबाईल वापरताना दिसल्या तर त्यांच्या वडिलांना दीड लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
जात पंचायतीचे स्वतःचे नियम असताना आणि हे नियम समाजाने मान्य करावे अशी अपेक्षा असते. रविवारी ठाकोर समाजाची खाप पंचायत पार पडली. यामध्ये अविवाहित मुलीने मोबाईल वापरणे हे, ठाकोर समाजाच्या नियमांचे उल्लंघन करत गुन्हा ठरवला जाणार आहे. जर का समाजातील मुली मोबाईल बाळगताना आढळल्या तर त्यांच्या वडिलांना 1.5 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरवार बंदी घालण्याच्या निर्णयावर दहा दिवसानंतर पुन्हा बैठक होणार आहे. (हेही वाचा: धक्कादायक! फुकटचे जेवायला मिळते म्हणून 4 पैकी 1 मुलगी जाते डेटवर: रिसर्च)
या बैठकीमध्ये 800 नेते सहभागी झाले होते. यामध्ये अजून काही नियमांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ठाकोर समाजामधील मुलाने इतर जातीच्या मुलीसोबत लग्न केल्यास 2 लाख रुपये दंड, विवाहावेळचा अवास्तव खर्च रोखण्यासाठी डिजे, फटाके वाजविण्यावर बंदी. कोटडा, गागुडा, ओडवा, हरियावाडा, मारपुरिया, शेरगढ, तालेपुरा, रानडोल, रतनपुर, दनारी आणि वेलावास गावांमध्ये हे नियम लागू करण्यात आले आहे.