मराठमोळ्या सतीश खंदारे यांच्या रुपात केंद्रशासित प्रदेश लद्दाखला मिळाले पहिले पोलीस प्रमुख

अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र असलेले खंदारे हे लद्दाखचे पहिले मराठी पोलीस प्रमुख ठरले आहेत.

Sachin Khandare (Photo Credit - Twitter)

केंद्रशासित प्रदेश म्हणून 31 ऑक्टोबरपासून अस्तित्वात आलेल्या लद्दाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे (Satish Khanadreयांची नियुक्ती करण्यात आली. अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र असलेले खंदारे हे लद्दाखचे पहिले मराठी पोलीस प्रमुख ठरले आहेत. खंदारे हे 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. खंदारे यांच्यावर संपूर्ण राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. केंद्रशासनाने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून जम्मू-काश्मीर आणि लद्दाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. गुरूवारपासून हे दोन्ही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे खंदारे यांची लद्दाखच्या पोलीस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत सतीश खंदारे ?

1995 मध्ये भारतातून 425 वी रँक घेऊन खंदारे आयपीएस अधिकरी झाले. त्यांनी धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयातून इयत्ता दहावीची परीक्षा दिली. त्यानंतर धामणगाव शहरातील सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून ते बारावी उत्तीर्ण झाले. खंदारे यांनी पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते 1992 मध्ये बीईचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षांनी खंदारे आयपीएस झाले. आयपीएस अधिकारी झाल्यानंतर खंदारे जम्मू-काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला.

हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये गिरीश चंद्र मुर्मू तर लडाखमध्ये आर. के. माथुर यांनी घेतली नायब राज्यपालपदाची शपथ

खंदारे यांनी 2005 मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, 2007 मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला.

जम्मू-काश्मीर आणि लद्दाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या नव्या नायब राज्यपालांनी गुरुवारी शपथ घेतली. गिरीश चंद्र मुर्मू यांनी जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतली. तर आर. के. माथुर यांनी लद्दाखच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतली. गेल्या महिन्यात भाजप सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. तसेच जम्मू-काश्मीर आणि लद्दाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले होते. या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनेसाठी 31 ऑक्टोबर हा दिवस निश्चित करण्यात आला होता.