New Coronavirus Strain: नव्या कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली 'No Corona, Corona No' ची घोषणा

आता ब्रिटनमध्ये नवा कोरोना व्हायरस आढळून आल्यानंतर रामदास आठवले यांनी नवीन कोरोना व्हायरसविरोधात No Corona, Corona No अशी घोषणा दिली आहे.

Union Minister Ramdas Athawale (PC - ANI)

New Coronavirus Strain: भारतात सुरुवातीला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी 'गो कोरोना, कोरोना गो' (Go Corona, Corona Go) अशी घोषणा दिली होती. आता ब्रिटनमध्ये नवा कोरोना व्हायरस (New Coronavirus Strain) आढळून आल्यानंतर रामदास आठवले यांनी नवीन कोरोना व्हायरसविरोधात No Corona, Corona No अशी घोषणा दिली आहे. यापूर्वी आठवले यांनी कोरोना विरोधात दिलेला 'गो कोरोना, कोरोना गो' चा नारा देशभरात प्रसिद्ध झाला होता. विशेष म्हणजे त्यानंतर आठवले यांच्या घोषणेवर आधारित अनेक गाणीदेखील तयार करण्यात आली होती.

आपल्या मजेशीर शैलीत कविता करणारे मंत्री रामदास आठवले देशभरात प्रसिद्ध आहेत. देशभरातून तसेच जगभरातून कोरोना निघून जावा, यासाठी आठवले यांनी गो कोरोना, कोरोना गो च्या घोषणा दिल्या होत्या. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रामदास आठवले 'गो कोरोना, करोना गो' अशा घोषणा देताना दिसले होते. (हेही वाचा - Mann Ki Baat on 27 December Highlights: 2021 मधील नववर्ष संकल्पामध्ये यंदा भारत देशासाठी देखील एक संकल्प करा- नरेंद्र मोदींचं आवाहन)

दरम्यान, आता ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू पहिल्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक घातक आणि जास्त वेगाने पसरणारा आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून नागरिकांना विशेष सूचना देण्यात येत आहेत. तसेच सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनहून येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या नव्या विषाणूशी लढण्यासाठी आता रामदास आठवले यांनी 'नो कोरोना, कोरोना नो,' अशी घोषणा दिली आहे. त्यामुळे पूर्वीच्या घोषणेप्रमाणे आठवले यांची ही घोषणादेखील सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात आठवले यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. मात्र, त्यानंतर आठवले यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.