CAA-NRC विरोधात झालेल्या हिंसाचारात रेल्वेचे 84 कोटींचे नुकसान; कोलकाता उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल
कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात रेल्वेने म्हटले आहे की, 13 ते 15 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक निदर्शनात रेल्वेला 84 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मुद्द्यांवर देशात वाद चालू आहे. झालेल्या हिंसाचारामध्ये सरकारी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. नागरिकत्व कायद्याच्या (CAA-NRC) विरोधात झालेल्या हिंसाचारामुळे रेल्वेला (Indian Railway) 84 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात रेल्वेने म्हटले आहे की, 13 ते 15 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक निदर्शनात रेल्वेला 84 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी यापूर्वीही ही माहिती दिली आहे. ज्यांनी तोडफोड आणि हिंसाचार केला आहे, त्यांच्याकडून ही नुकसान भरपाई घेतली जाईल असे सांगितले गेले आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रेल्वेने सांगितले की, घडलेल्या निषेधादरम्यान पश्चिम बंगालमधील संक्राईल रेल्वे स्थानकात तिकिट काउंटरला आग लावण्यात आली. सुजनीपारा रेल्वे स्थानकात तोडफोड करण्यात आली. कृष्णपूर रेल्वे स्थानकाजवळील लालगोला येथे उभ्या असलेल्या काही गाड्यांना आग लागली. हरिश्चंद्रपूर स्थानक मोडकळीस आले आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडून ही नुकसान भरपाई केली जाईल. (हेही वाचा: हिंसाचार थांबल्यानंतर CAA बाबतच्या वैधतेवर सुनावणी होणार- सुप्रीम कोर्ट)
यावर पश्चिम बंगाल सरकारने कायदा व सुव्यवस्था ही राज्याची जबाबदारी आहे आणि त्यावर आम्ही कार्य करीत आहेत. लवकरच ही वसुली केली जाईल असे सांगितले आहे. संरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा संमत केला आहे, जेणेकरून देशात राहणारे हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन आणि जैन शरणार्थी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळेल. या कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या अल्पसंख्याक निर्वासितांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.