India-China Clash: पंतप्रधान मोदी, केंद्र सरकारला शिवसेनेचा टोला, 'पंडित नेहरु यांना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल'
साधे कॅनव्हासचे बूड, शस्त्र-गोळ्यांची टंचाई, अनोळखी प्रदेश अशी तेव्हा परिस्थिती होती. आज सर्वकाही आहे, पण तरीही चिन्यांनी आमच्या जवानांचे क्रुर बळी घेतले. पंडित नेहरुंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!'- सामना
लद्दाख प्रदेशातील गलवान (Galwan Valley) खोऱ्यात चीनच्या आगळिकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यावर शहिदांचे बलिदान वाया जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी म्हटले. तसेच, कोणी डिवचल्यास उत्तर देण्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. यावरुन 'पंडित नेहरु यांना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल', असा टोला पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Saamana Editorial) संपाकीयातून लगावण्यात आला आहे.
'हे डिवचणे नाही काय? पंडित नेहरु ते मोदी!' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात दै. सामनामध्ये म्हटले आहे की, 'मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. 20 जवानांना हाल हाल करुन मारले हे डिवचणे नाही काय? नेहरुंच्या काळात चिन्यांशी लढताना आमचे सैनिक विषम स्थितीत होते. साधे कॅनव्हासचे बूड, शस्त्र-गोळ्यांची टंचाई, अनोळखी प्रदेश अशी तेव्हा परिस्थिती होती. आज सर्वकाही आहे, पण तरीही चिन्यांनी आमच्या जवानांचे क्रुर बळी घेतले. पंडित नेहरुंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!' (हेही वाचा, India-China Clash: भारत-चीन सीमेवर जवानांची बलिदाने थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे- शिवसेना)
सामनामध्ये पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानी सैनिकांनी कश्मीरात आमच्या जवानांची मुंडकी कापून नेली. तेव्हा एकाच्या बदल्यात पाकड्यांची 10 मुंडकी उडवून आणू असे आपण सगळेच ओरडत होतो. सौरभ कालिया प्रकरणही आपणास विसरता येणार नाही. बांग्लादेशच्या सीमेवरही आमच्या जवानांना असेच निर्घृणपणे मारले होते. आता चिनने आमच्या 20 जवानांना अत्यंत अमानुषपणे मारले. 150 पेक्षा जास्त जवान जखमी व अत्यावस्थ आहेत. पंतप्रधान मोदींनी आता घाईघाईने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मोदी यांनी त्याआधी दिल्लीतून असेही निवेदन केले की, ''हिंदुस्थान आपला स्वाभिमान आणि एक एक इंच जमिनीचे संरक्षण करेल'' मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. 20 जवानांना हाल हाल करुन मारले हे डिवचणे नाही त काय? इतर स्वाभिमानी देश, एका जवानावर हल्ला झाला तरी देशाच्या स्वाभिमानावर हल्ला झाला असे समजून बदला घेतात. तव्हा आपल्या 20 जवानांना चिन्यांनी ठार केले हे डिवचणेच आहे.