Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणूक अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, शिवसेना, भाजप, काँग्रेस नेत्यांकडून दणादण प्रतिक्रिया
त्यासाठी महाविकासाघाडीच्या शिष्टमंडळाकडून शिष्टाईचे प्रयत्नही करण्यात आले. मात्र, भाजप आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आता ही निवडणूक अटळ आहे.
राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election 2022) बिनविरोध करण्यासाठी महाविकासआघाडीने जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी महाविकासाघाडीच्या शिष्टमंडळाकडून शिष्टाईचे प्रयत्नही करण्यात आले. मात्र, भाजप आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आता ही निवडणूक अटळ आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी भाजपचे उमेदवार रिंगणात आले आहेत. वास्तवात केवळ दोन पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसत असले तरी महाविकासआघाडीच्या रुपात शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) अशा सर्व घटक पक्षांसह विरोधात असलेल्या भाजपचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, निवडणूक अटळ असल्याचे दिसताच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडूण प्रतिक्रियांचा दणका उडवून देण्यात आला आहे.
आता खरी सुरुवात झाली- संजय राऊत,खासदार (शिवसेना)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, भाजप राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे आता निवडणूक अटळ आहे हे स्पष्ट झाले आहे. या निमितिताने मी खात्रीने सांगतो. महाविकासआघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील. आता खरी सुरुवात झाली. आम्हीच जिंकू. या वेळी मतांची फाटाफूट होण्यास तशी संधी नाही. कारण या निवडणुकांमध्ये गुप्त मतदान पद्धतीन नसते. आपल्या पक्षाच्या प्रतिनिधिंना दाखवूनच मतदान करावे लागते. प्रश्न फक्त अपक्षांचा असतो. तर अपक्षही आमच्यासोबत असतील. कोणी फोडाफोडी करण्याचा प्रयत्नही करु नये. प्रयत्न झालाच तर त्यांना आम्ही परतही आणले आहे. त्यामुळे आता कोणी तसा प्रयत्न करु नये. ते दिवस केव्हाच संपले आहेत. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: बिनविरोध राज्यसभा निवडणुकीसाठी मविआ आग्रही, भाजप उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम)
अर्ज मागे घेण्याची मुदत संपली- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष (भाजप)
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकासआघाडीचे नेते मला आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटले. दोन्ही बाजूंनी छान चर्चा झाली. त्यातून ठोस निर्णय मात्र होऊ शकला नाही. दोन्ही बाजूंनी एकमेकांना प्रस्ताव देण्यात आले. मात्र, दोन्हीही बाजूंनी एकमेकांचे प्रस्ताव स्वीकारल्याची कोणतीही माहिती एकमेकांना देण्यात आली नाही. आता तर अर्ज मागे घेण्याची मुदतही संपून गेली. परिणामी आता निवडणूक अटळ आहे.
महाविकासआघाडीचाच उमेदवार विजयी होईल- बाळासाहेब थोरात (काँग्रेस ज्येष्ठ नेते)
महाराष्ट्राला चर्चेची परंपरा आहे. चर्चेतून तोडगा निघाला की मग इतर गोष्टी आपसूकच थांबतात. त्यासाठी मविआचे नेते भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटले. त्यांना विनंती केली. त्यांनी मविआची विनंती मान्य केली असती तर निवडणूक टळली असती. परंतू,तसे काही घडले नाही. असो. असे असले तरी मविआचा विजय नक्की आहे. आवश्यक मतांचा कोटा मविआकडे नक्कीच आहे. तरीही आम्ही योग्य ते नियोजन केले आहे. योग्य काळजी घेतल्याने अपक्षांचेही आम्हाला चांगले सहकार्य लाभेल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.