नरेंद्र मोदी विकास नव्हे भकास पुरूष : राज ठाकरेंची मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना,#MeToo वादात अडकलेल्या नाना पाटेकरांबाबतही आपले मत मांडले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या १० दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल अमरावतीत श्री शिवाजी शारीरिक शिक्षण मैदानात श्री अंबा फ़ेस्टीवलच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना, #MeToo वादात अडकलेल्या नाना पाटेकरांबाबतही आपले मत मांडले.
मोदी सरकारवर टीकास्त्र
आपण रतन टाटा यांच्या सांगण्यावरून गुजरातला गेलो तेव्हा जो गुजरात मला दाखवण्यात आला त्यावरून मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून बघू इच्छितो असं म्हटलं होतं. पण तेव्हाचे मोदी आणि आताचे मोदी यात बराच फरक आहे म्हणून माझी भूमिका बदलली. ते वारंवार खोटं बोलत आहेत हे लक्षात यायला लागलं आहे. अशी टीका राज यांनी केली. मोदी हे विकास पुरुष नसून भकास पुरुष झाले आहेत असा टोला पण लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत ज्या एक लाख वीस हजार विहीरी बांधल्या त्या शोधायला मी आलेलो नाही, कारण ते मुळात खोटं आहे अशी टीका त्यांनी केली.
शिवसेनेचे इशारे हास्यास्पद
राज यांनी आपल्या मुलाखतीत शिवसेनेवर सुद्धा तोंडसुख घेतले. पैशांची कामे असली की सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी द्याायची आणि नसली की ती मागे घ्यायची, असे शिवसेनेचे चालले आहे. तसेच त्यांचे हे इशारे हास्यास्पद ठरू लागले आहेत. दसरा मेळाव्यात सुद्धा हेच ऐकायला मिळणार आहे असं सुद्धा राज म्हणाले.
नाना पाटेकरांना पाठींबा
सध्या सुरु असलेल्या #Metoo मोहिमेवर सुद्धा राज यांनी आपली मतं मांडली. या संवेदनशील विषयाची चेष्टा व्हायला नको, त्याचं गांभीर्य जायला निघून जायला नको, असं आपलं परखड मत आहे असं राज म्हणाले. या प्रकरणात माध्यमांनी ‘ट्रायल’ घेऊ नये. आपली न्यायालये अशी प्रकरणे हाताळण्यात सक्षम आहेत. नाना पाटेकर आपले मित्र आहेत. कधी कधी ते उद्धटपणे वागतात पण सह अभिनेत्रीसोबत त्यांनी अशी गैरवर्तवणूक केली नसेल. असा विश्वास राज यांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता बोलून दाखवला. . नक्की वाचा: नाना कितीही खराब असला तरी असले गैरवर्तन करणार नाही; राज ठाकरेंचा पाठींबा.